पुणे – पीएमपीएमएल कडून आज दिनांक २९/०१/१०२२ पासून मार्ग क्रमांक १५९ ब पुणे मनपा भवन ते पाबळ गाव हा
नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला आहे.खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते पुणे मनपा बस स्थानक येथे
या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अॅड. सुरेश पलांडे,अमित सोनवणे, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक
दत्तात्रय झेंडे, न.ता.वाडी डेपो मॅनेजर नारायण करडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्ग क्रमांक १५९ ब पुणे मनपा भवन ते पाबळ गाव या बससेवेचा मार्ग पुणे मनपा भवन, जुना बाजार, पुणे स्टेशन,
बंडगार्डन, येरवडा, रामवाडी, विमाननगर कॉर्नर, चंदन नगर, बायपास, खांदवेनगर, वाघेश्वर मंदिर, वाघोली, केसनंद फाटा,
बी.जी.एस.कॉलेज, लोणीकंद, पेरणे फाटा, कोरेगाव, कल्याणी फोर्ज, सणसवाडी, शिक्रापूर, पाबळ फाटा, कस्तुरी कॉलेज,
जातेगाव, मुखई, गंगासागर, धामारी, डफळ वस्ती, शिवराज ढाबा, चौधरी वस्ती, पाबळ गाव असा असणार आहे.
याप्रसंगी बोलताना बापट म्हणाले,“ही बस सेवा सुरू झाल्यामुळे पाबळ परिसरात उद्योगधंद्यांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.
बस सेवा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी पाबळ परिसरातील नागरिकांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे.” स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले,“मागील पाच वर्षात पीएमपीएमएलच्या ताफ्यात
महानगरपालिकेच्या माध्यमातून १००० सीएनजी व ई बस दाखल झालेल्या आहेत. पीएमपीएमएलच्या सक्षमीकरणासाठी
आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.” याप्रसंगी बोलताना पीएमपीएमएल चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले, “पुणे मनपा भवन ते
पाबळ गाव या बससेवेसाठी खासदार गिरीश बापट, हेमंत रासने यांनी विशेष प्रयत्न केले. सध्या या बसमार्गावर ३ बसेसद्वारे बससेवा उपलब्ध असेल. मनपा ते पाबळ गाव १२ खेपा व शिक्रापूर ते पाबळ गाव १० खेपा होणार आहेत. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा.” मनपा ते पाबळ गाव पहिली बस सकाळी ५.१५ वा. तर शेवटची बस संध्याकाळी ८.४० वा. आहे. तसेच पाबळ गाव ते मनपा पहिली बस सकाळी ६.३० तर शेवटची बस संध्याकाळी ७.२० वा. आहे. सदरच्या उदघाटन समारंभास पाबळ, जातेगाव, मुखई यासह परिसरातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

