पुणे-पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा नाकारल्यामुळे रुबी रुग्णालयात एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपुर्वी जन्मलेल्या अर्भकास ह्रदयविकाराची समस्या असल्याने पुण्यातील आम्रपाली आणि गौरव खुंटे या दाम्पत्याने आपल्या अर्भकाला पुण्यातील प्रसिद्ध रुबी रुग्णालयात शनिवारी उपचारासाठी दाखल केले होते. नवजात बालकावर शस्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. या शस्रक्रियेसाठी रुग्णालय प्रशासनाने बाळाच्या कुटुंबियांना ३ लाख ५० हजार रुपये भरण्यास सांगितले होते. एवढी मोठी रक्कम एकाच वेळी भरण्याचे सांगताना रुग्णालयाने बालकाच्या कुटुंबियांना नव्या नोटांची अट घातली होती.अशी माहिती खुंटे यांनी माध्यमांना दिली
जुन्या नोटा व्यवहारातुन हद्दपार केल्यानंतर रुग्णालये, मेडिकल तसेच पेट्रोलपंप यासारख्या ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्यात येतील असे सकारने आदेश दिले असताना रुबी रुग्णालयाने जुन्या नोटा घेण्यास नकार दिल्याचा आरोप बालकाच्या कुटुंबियांनी केला आहे.
नोटाबंदीनंतर बऱ्याच ठिकाणी धनादेशाच्या माध्यमातून व्यवहार सुरु आहेत. हे लक्षात घेऊन खुंटे कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाला धनादेश देण्याची देखील तयारी दाखवली होती. पण रुग्णालय प्रशासनाने धनादेश घेणे सुद्धा नाकारले अशी माहिती नोटांबंदीमुळे बालक गमावलेल्या कुटुंबियांनी दिली.दरम्यान यासंदर्भात रुबी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.