पुणे, ता. ५ मार्च : टीव्ही आल्यावर वाचन संस्कृती कमी झाली. वाचन हेच ज्ञानाचा आधार आहे. तो जपला पाहिजे. झपाट्याने वाचन केले पाहिजे. अभ्यासाव्यतिरिक्त पूरक वाचन आवश्यक आहे. वाचनाच्या संस्कारांमुळे माणूस चांगला बनतो. त्यासाठी वाचन संस्कृती जपण्याची गरज असून ती वाढविण्यासाठी सिटी लायब्ररीसारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
पुणे महापालिका आणि जावडेकर यांच्या खासदार निधीतून घोले रस्त्यावर उभारण्यात येणार्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सिटी लायब्ररी’ प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. जावडेकर यांनी प्रकल्पासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या प्रयत्नातून प्रकल्प साकारत आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनीता वाडेकर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक सुशील मेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जावडेकर पुढे म्हणाले, ‘पुणे विद्येचे माहेरघर आहे. देश-विदेशातून विद्यार्थी आणि पर्यटक शहरात येत असतात. त्या सर्वांसाठी हे प्रेक्षणीय स्थळ आणि पुण्याचे वैभव ठरेल असा विश्वास वाटतो. या ठिकाणच्या मामाराव दाते मुद्रणालयाचे सिंहगड रस्त्यावर स्थलांतर करण्यात आले आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे मुद्रण व्यवसायात आमूलाग्र बदल झाले आहेत. कमी जागेत मुद्रणालयाचे उत्तम व्यवस्थापन होऊ शकेल.’
शिरोळे म्हणाले, ‘वस्ती विभागांमध्ये विद्यार्थी कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असतात. अभ्यासासाठी आवश्यक सुविधा नसल्यामुळे त्यांची एकाग्रता होत नाही. त्यामुळे खूप जिद्दीने अभ्यास करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प उपयोगी ठरेल. या प्रकल्पामुळे भावी पिढीतील विद्यार्थ्याची स्वप्नपूर्ती होऊ शकेल.’
एकबोटे म्हणाल्या, ‘ग्रंथालये समाजाचा आत्मा आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना ५० हजाराहून अधिक पुस्तके उपलब्ध होतील. पहिल्या टप्प्यात ४०० विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा मिळणार आहे. दुसर्या टप्प्यात आणखी ४०० विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. डिजिटल लायब्ररीची सुविधा देणार आहोत. अशाप्रकारची राज्यातील महापालिकेचे व्यवस्थापन असणारी पहिलीच लायब्ररी ठरणार आहे.’
डॉ. वैजयंती जाधव यांनी सूत्रसंचालन, एकबोटे यांनी प्रास्ताविक आणि उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.

