पुणे :
“राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी क्रीडा विभागा’तर्फे बाबूराव सणस मैदानाची पाहणी करण्यात आली. अनेक त्रुटी व असुविधांच्या संदर्भात “राष्ट्रवादी क्रीडा विभागा’तर्फे शहराध्यक्ष विपुल म्हैसूरकर यांच्या नेतृत्वाखाली, महापौर प्रशांत जगताप व “स्थायी समिती’ अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांची भेट घेऊन सणस मैदानाची स्थिती त्वरित सुधारावी म्हणून निवेदन देण्यात आले.
यावेळी विपुल म्हैसुरकर यांच्याबरोबर उपाध्यक्ष प्रशांत कदम, वहाब, सरचिटणीस आलिम पठाण, राहुल कांबळे, पर्वती अध्यक्ष समीर पवार, सणस मैदानावरील ऍथलॅटिक्स प्रशिक्षक अभय मळेकर, विजय बेंगळे, तांबे सर व इतर कार्यकर्ते उपस्थित होेते.
क्रीडा शहर अध्यक्ष विपुल म्हैसूरकर यांनी सांगितले की, “पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी क्रीडा सेल विभागा’तर्फे सणस मैदानाची पाहणी केली. या पाहणीत मैदानाची अत्यंत खराब अवस्था झाल्याचे दिसून आले. यात रनिंग ट्रॅकवर अनेक ठिकाणी वाळू उडाली आहे व खड्डे पडले आहेत. रनिंग मार्क पुसले गेले आहेत, गोळाफेकीच्या स्थानाची दुर्दशा झाली आहे. रनिंग ट्रॅकच्या शेजारी आच्छादने तुटली आहेत.’
“पुणे शहरात ऍथलॅटिक्स खेळणाऱ्या खेळाडूंना सराव करण्यासाठी हे एकमेव मैदान शहराच्या मध्यभागी उपलब्ध आहे, तरी हे मैदान वेगवेगळ्या कारणांसाठी भाड्याने दिले जाते. त्यामुळे या मैदानाची सतत दुर्दशा होते. व येथे सराव करणाऱ्या खेळाडूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पुणे शहरात आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत, पण ते तयार करण्यासाठी त्यांना योग्य त्या सुविधा पुरविणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आज महापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांना भेटून मैदान सुधारणे यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे.’
महापौरांनी आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहणी करू, असे सांगितले तर स्थायी समिती अध्यक्षांनी सुधारणा करण्याचे आश्वासन देत त्वरित संबंधित विभागाच्या नावाने पत्र पाठविले.

