नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली येथे रविवारी (ता. ११) होणार आहे. विरोधी ऐक्यासाठी दिल्लीत सुरू झालेले भेटीगाठींचे सत्र पाहता या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपला धक्का देण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीची ब्लू प्रिंट मांडण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मनोमिलन करण्यासाठी संयुक्त कार्यक्रम हे पाटना, कोलकाता तसेच मुंबई येथे घेतले जावेत, अशी सूचनाही राष्ट्रवादीमधून पुढे आल्याचे कळते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन तालकटोरा स्टेडियममध्ये रविवारी (ता. ११) होणार आहे. या अधिवेशनात राजकीय त्याचप्रमाणे आर्थिक सामाजिक, कृषी विषयक, महिला सक्षमीकरण, परराष्ट्र संबंध यावरील ठरावही संमत केले जाणार असले तरी त्यात विरोधी पक्षांच्या एकजुटीची आवश्यकता आणि रुपरेषेची मांडणी महत्त्वाची असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी, शनिवारी (ता. १०) पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक होणार असून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
विरोधी ऐक्यासाठी किमान समान कार्यक्रमाचे सूतोवाच शरद पवार यांनी अलीकडेच केले होते. त्यापार्श्वभूमीवर सूत्रांनी सांगितले, की राजकीय विचारसरणीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत समानता आहे. जेडीयू, सप यांच्यात आणि काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद नाहीत. माकप सरचिटणीस सीताराम येचुरी ऐक्याबाबत व्यवहार्य भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. तेलंगण राष्ट्र समिती पक्षही काँग्रेसशी तडजोडीच्या मनस्थितीत आहे. परंतु ‘आप’, तृणमूल यांचे काँग्रेसशी मतभेद आहेत. ओडिशामध्ये भाजपला शिरकाव करू देणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री नवीन पटनाईकांना भाजपशी थेट संघर्ष नको आहे. त्यामुळे हा सर्व विरोधाभास बाजूला ठेवून सर्वांना एकत्र आणण्यासाठी किमान समान कार्यक्रम आवश्यक असल्याचे पवार यांनी म्हटल्याचे या सूत्रांनी सांगितले.
मोदी सरकारची पोलखोल पुस्तिका !
पंतप्रधान मोदींच्या घोषणा आणि त्यांच्या अंमलबजावणीची नेमकी वस्तुस्थिती यातील विरोधाभास मांडणारी पुस्तिका या अधिवेशनात प्रसिद्ध करून सरकारला घेरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीला २०२२ पर्यंत ब्रॉडबॅन्ड सेवेने जोडणे, प्रत्येकाला शौचालय देण्याची घोषणा, २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याची योजना यासारख्या सरकारच्या घोषणा, माहिती आणि संसदेतील उत्तरे या आधारे सरकारची पोलखोल केली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.