पहा –वाचा -आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काय म्हटले आहे ….
अच्छे दिन काय आहेत, हे पाहण्यासाठी लोकांनी भाजपला मतदान केले. केंद्रात, राज्यात त्यांचे सरकार आले. शेती हा या देशाचा कणा होता. मागच्या दोन वर्षांत शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात मी अनेक वर्षे शेतीक्षेत्रात लक्ष घातलेले आहे.
१९७८ साली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याआधीही मी शेतीचा मंत्री होतो. मुख्यमंत्री झाल्यावरही शेतीचे खाते मी माझ्याकडे ठेवले होते. केंद्रातही १० वर्षे शेतीचे काम मी पाहिले. ज्या वेळी अन्नधान्ये आपण बाहेरून आणत होतो त्या वेळी आपले उत्पादन वाढवण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले होते. परदेशातून अन्नधान्ये आणायची आम्ही बंद केले.
मी कृषिमंत्री झालो तेव्हा काही हजार कोटींचा गहू आपण आयात करत होतो. पण मी कृषी खाते सोडले त्या वेळी भारत जगात तांदळाची निर्यात करणारा प्रथम क्रमांकाचा देश होता. तो द्वितीय क्रमांकावर गव्हाची निर्यात करणारा देश, साखर निर्माण आणि निर्यात करणारा द्वितीय क्रमांकाचा देश झाला होता.
भारतातल्या शेतकऱ्यांनी घाम गाळला, सरकारने त्याच्या मालाला योग्य किंमत दिली, ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली त्यामुळेच अन्नधान्याची टंचाई दूर झाली. असे असतानाही आत्महत्या का होत आहेत? याचे कारण डोक्यावरचे ओझे नंतर वाढले. आम्ही निर्णय घेतला होता की पीककर्ज घ्यायचे असेल आणि तीन लाखांपर्यंत कर्ज घेऊन ते वेळेत परत दिले असेल तर फक्त चार टक्के व्याज घ्यायचे. याच्याही पुढे जाऊन पुणे मध्यवर्ती बँक – ज्याचे नेतृत्व अजित पवार करतात – यांनी वेळेवर कर्ज परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याज आकारला. पुणे, सातारा आणि जिथे राष्ट्रवादीचे सहकारी काम करत होते तिथे तिथे वेळेवर कर्जे परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याज आकारण्यात आले होते.
पण सध्याच्या सरकारने यात लक्ष घातलेले नाही. शेतीप्रधान देश असूनही या देशातल्या कृषिमंत्र्यांचे नाव कुणाला माहीत नाही. कृषिमंत्र्यांच्या बाबतीत माझी काही वैयक्तिक तक्रार नाही. पण त्या घटकांत काम करणाऱ्या लोकांना विश्वास वाटला पाहिजे की हा नेता माझ्यामागे आहे. आज या विश्वासाची कमतरता आहे, त्यामुळे आज आत्महत्या वाढल्या आहेत.
मी कृषिमंत्री असताना आत्महत्या झाल्या नाहीत, असे मी म्हणत नाही. पण आत्महत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना धीर दिला, त्यांना मदत केली. त्यांच्या डोक्यावरची कर्जे माफ करून त्यांना पुन्हा उभारी देण्याची खबरदारी घेतली.
पण आजचे सरकार हे करताना दिसत नाही. हातात सत्ता असलेल्यांच्या मनात शेतकरी, कष्टकरी यांच्याबद्दल आस्था नाही. त्याचा परिणाम देशात दिसायला लागला आहे.

