पिंपरी -राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पिंपरी-चिंचवड शहर आधीच स्मार्ट बनवले आहे असे येथे काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले .
पुढे ते असेही म्हणाले कि , औद्योगिकीकरण जिथे होते तिथे बकालपणा वाढतो. पण पिंपरी-चिंचवडमध्ये बकालपणा वाढला नाही. विकासावर व्यवस्थित काम झालेच पाहिजे, त्यात तडजोड नाही, असा कटाक्ष होता. जर कोणी चुकीचे काम केले तर तो कितीही जवळचा असला तरी त्याला बाजूला करणारा अजितदादांसारखा नेता या भागाला लाभला. मेळाव्यादरम्यान दाखवलेली चित्रफित पाहून विचार आला की हे शहर किती बदलले!
आज देशामध्ये स्मार्ट सिटीची चर्चा आहे. पंतप्रधान पुण्यात येऊन स्मार्ट सिटीचे उद्घाटन करणार आहेत. चांगली गोष्ट आहे. शहरे स्मार्ट झालीच पाहिजेत. यात आम्ही कुठलेही राजकारण करणार नाहीत. उलट साथ देण्याची आमची भूमिका असेल. पण आमची अपेक्षा होती, पिंपरी-चिंचवडची निवड होईल. मोदी साहेब सांगत असलेली ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना केंद्राने मांडायच्या आधीपासून इथल्या नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तशी अमलबजावणी केलेली आहे.
पुणे शहराच्या स्मार्ट सिटीसाठी बाणेर रोडची निवड झाली. गंजपेठ, भवानी पेठ, येरवडा झोपडपट्टीचा भाग सुधारतील, अशी अपेक्षा होता. पण यांनी तर बाणेरचा भाग घेतला – जो आधीच आमच्या लोकांनी सुधारला आहे. ‘स्मार्ट सिटी’साठी पर्वतीचा झोपडपट्टीचा भाग घेतला असता आणि तिथल्या लोकांना चांगल्या प्रकारचा निवारा दिला असता तसेच तिथल्या टेकडीवर वृक्षवल्ली लावून परिसर हिरवागार केला असता तर बरे झाले असते. लोकांनी नाव काढले असते.
बालेवाडी स्मार्ट करण्याचा विचारही आहे. बालेवाडी कुणी स्मार्ट केली हे सर्वांना माहीत आहे. तिथले क्रीडासंकुल प्रसिद्ध आहे. जे काम करतात त्यांच्याकडे लक्ष दिले असते तर काम करणारा प्रोत्साहित झाला असता. पण लक्ष दिले नाही म्हणून पिंपरी-चिंचवडचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निराश न होता काम करत राहील.
या कामाची पावती म्हणून या भागातले सर्व मतदार २०१७ फेब्रुवारीला राष्ट्रवादीला प्रचंड मते दिल्याशिवाय राहणार नाहीत, याची मला खात्री आहे.असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले .

