पुणे: कोथरुडमधील ठरलेल्या जागेवर शिवसृष्टीचा निर्णय करत नाही,ती बीडीपी च्या जागेत ढकलता आणि नंतर लगेचच आंबेगावमधील बाबासाहेब पुरंदरे उभी करत असलेल्या शिवसृष्टीला 300 कोटी देता? तुम्ही पुणेकरांची फसवणूक करत आहात, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
लाल महालात आयोजित करण्यात आलेल्या बहुजन अस्मिता परिषदेत पवार बोलत होते. स्मारकांसंबंधाने शासनाने काढलेला जीआर वाचून दाखवत पवारांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
फडणवीस सरकारने फक्त घोषणा केल्या. शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाची भूमिपूजने केली, मात्र कुठलेही काम सुरू नाही. जिजाऊंच्या सिंदखेडराजाला निधीची घोषणा केली, मात्र एक काम सुरू नाही.
लोकांची मागणी असलेल्या कोथरुडमधील जागेवर शिवसृष्टीचा निर्णय करत नाही आणि कोणालाही विश्वासात न घेता आंबेगावमधील बाबासाहेब पुरंदरे उभी करत असलेल्या शिवसृष्टीला ३०० कोटी कसे काय देता? सरकार पुणेकरांची फसवणूक करत आहे. हे सरकार करतंय इतकं दुटप्पी राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते.
पवार म्हणाले, कुठलेही आणि सोयीचे निर्णय घेतले जात आहेत. दीपक मानकर आणि सहकाऱ्यांनी कोथरुडला शिवसृष्टी उभारण्याची मागणी लावून धरली होती. मेट्रोच्यावर स्लॅब टाकून शिवसृष्टी उभारता आली असती. पण ती बीडीपीमध्ये उभारण्याचा निर्णय झाला. त्यासंदर्भात सह्याद्रीवर बैठक झाली. त्यानंतर दोन दिवसांत कुणालाही न सांगता आंबेगाव येथील बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला 300 कोटी देण्यात आले. वास्तविक राज्य सरकार किंवा महानगरपालिकेशी संबंधीत कामाला पैसे दिले असते तर चालले असते. यात पुणेकरांना फसवले जातेय. एकीकडे बीडीपीमध्ये शिवसृष्टी उभारणार असे म्हणताय, दुसरेकडे 300 कोटी देवूनही टाकताय. त्या शिवसृष्टीसंबंधी पर्यटनाचे निर्णयही घेताय. हे दुटप्पी राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. स्पष्टपणे सांगायला हवे होते, तीच शिवसृष्टी उभारु म्हणून. तिथे विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष बनवून काम करता आले असते.