चांगल्या राजकीय पर्यावरणासाठी ‘गांधी मार्ग’ महत्वाचा – अरुण खोरे
राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनानिमित्त व्याख्यानाला चांगला प्रतिसाद
पुणे :
‘महात्मा गांधींचे विचार कालबाह्य झालेले नसून प्रत्येक दिवसागणिक या विचारांचे महत्व वाढत आहे. देशातील चांगल्या राजकीय पर्यावरणासाठी ‘महात्मा गांधी’ हा मार्ग दिशादर्शक ठरणार आहे’ असे मत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वर्धापनदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात अरुण खोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार वंदना चव्हाण होत्या. व्यासपीठावर डॉ. सुधीर भोंगळे, अॅड. म. वि.अकोलकर उपस्थित होते. डॉ. सुधीर भोंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघात सोमवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.
अरुण खोरे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनातील मार्गदर्शक विचार आणि प्रसंग या व्याख्यानादरम्यान सांगितले.
ते म्हणाले, ‘सार्वजनिक जीवनातील शिकवणूक गांधीजींमुळे मिळाली’ असे नेहरू यांनीही म्हटले होते. आजही हे वाक्य लागू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनीही गोखले -गांधी -नेहरू -यशवंतराव चव्हाण अशा नात्यांच्या मालिकेतून, परंपरेतून प्रेरणा घ्यावी. हा वारसा पुढे नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. या नेत्यांची मुल्ये पायी तुडवली जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. इतरांबद्दल राग, द्वेष बाळगू नये’ हा गांधींचा संदेश देखील कार्यकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.’
पुण्यातून गांधीना अनेक सहकारी मिळाले. गोखले यांच्यासारखा गुरु मिळाला. गांधीजी आणि गोपाल कृष्ण गोखले यांची भेट फर्गसन महाविद्यालयात जेथे झाली ती जागा मात्र नरेंद्र मोदी यांनी फर्गसन महाविद्यालय भेटी दरम्यान पाहायला हवी होती, असे मतही खोरे यांनी व्यक्त केले.
कार्यकर्त्यांनी वैचारिक वाचन वाचून कामाची बैठक पक्की करावी. त्यातून पक्षाची भूमिका जनतेला समजावून सांगावी’ असे आवाहन सुधीर भोंगळे यांनी व्यक्त केले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.