मुख्यमंत्र्यांचे कृषी सेवक संशयास्पद भरती प्रक्रियेसंदर्भात कार्यवाहीचे आदेश खा.वंदना चव्हाण यांच्या निवेदनानंतर घेतली दखल
पुणे :
एमपीएससी कृषी सेवक पदभरती 2016 अंतर्गत संशयास्पद भरती प्रक्रियेबाबत खासदार अॅड.वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारवाई करणेबाबत निवेदन दिले होते. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त विकास देशमुख यांची देखील भेट घेतली होती. खासदार वंदना चव्हाण सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा करीत आहेत.
कृषी सेवक पदभरती 2016 अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालासंदर्भात काही संबंधित परीक्षार्थींनी खा.वंदना चव्हाण यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून ज्या बाबी प्रकर्षाने समोर येत आहेत त्या धक्कादायक आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. म्हणूनच या विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करावा व दोष आढळल्यास त्वरीत कारवाई करावी, असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले होते.
तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर निवेदनातील विषयाची दखल घेत पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात आदेश देणारे पत्र अपर मुख्य सचिव (कृषि) यांना दिले आहे.
मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार त्वरीत कार्यवाही करून भरती प्रक्रियेत काही दोष आढळल्यास, दोषींवर कारवाई करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा खा.वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.