उद्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत बसणार उपोषणाला
पुणे :
‘शेती मालाच्या भावाची हमी द्या, शेतकर्यांना कर्जमुक्ती द्या’ याकरिता पुण्यात डॉ. बाबा आढाव यांनी चालविलेल्या उपोषणास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी आज सकाळी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत अॅड. म. वि. अकोलकर, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अशोक राठी, प्रमोद राणा इत्यादी उपस्थित होते.
‘महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजूर यांना शेतीमालाला हमीभाव न मिळाल्याने प्रतिदिन आत्महत्या करीत असून, त्यांचे संसार देशोधडीला लागले आहेत. अशावेळी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे बोट न दाखविता त्वरित निर्णय घ्यावा’, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी त्वरित डॉ.बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडविला पाहिजे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उद्या दि. 7 ऑक्टोबर 2016 (शुक्रवार) रोजी दुपारी 4.30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केटयार्ड, पुणे येथे उपोषणाला बसणार आहेत. शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषण करणार आहेत.

