पुणे :राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने “Unite To End Violence Against Girls And Women” मोहिम राबविण्यात आली. लहान मुली, युवती व महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. म्हणूनच समाजात जागृती निर्माण करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते
राष्ट्रवादी युवती काॅंग्रेस पुणे शहर अध्यक्ष मनाली भिलारे व सांस्कृतिक, कला व साहित्य विभागाचे सनी मानकर यांनी हा उपक्रम राबविला.
शहरातील प्रमुख भागात कथ्थकली व ग्रुप डान्स च्या स्वरूपात समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न या मोहिमेंतर्गत युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. खासदार वंदना चव्हाण देखील या मोहीमेला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या.
औंध, परिहार चौक, जंगली महाराज रोड, एफ.सी. रोड, डेक्कन, सारसबाग, सिंहगड रोड, कर्वेनगर, एम.आय.टी.कॉलेज, पौड़ रोड या भागांत ही मोहीम राबविण्यात आली. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मोहिमेला मिळाला.
याप्रसंगी बोलताना मनाली भिलारे म्हणाल्या ‘लहान मुली, युवती व महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊन या अत्याचारांचे स्वरूप देखील भयानक होत आहे. महिलांवरील अत्याचार हा केवळ स्त्री जातीचा प्रश्न नाही तर हा सामाजिक प्रश्न आहे म्हणूनच आपण सर्वांनी या प्रश्नावर एकत्र काम करण्याची गरज आहे.’
सनी मानकर म्हणाले ,’समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी ही मोहिम राष्ट्रवादी युवती काॅंग्रेस आणि सांस्कृतिक, कला व साहित्य विभाग यांनी हाती घेतली आहे .यामध्ये महिला, युवती, युवक सर्वानी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.

