पुणे :लोहगाव विमानतळाजवळील घरे पाडण्याच्या पुणे पालिकेच्या नोटीसनंतर संरक्षण खात्याच्या निकषानुसार फेरसर्वेक्षण करावे या मागणी संबंधी आणि कोंढवा येथील संरक्षण खात्याच्या जागेतून जलवाहिनी ला परवानगी मिळण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी खासदार वंदना चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबरोबर दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली .
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने ही चर्चा झाली .
कोंढवा येथे ६ कोटी खर्च करून पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे . संरक्षण खात्याच्या ४०० मीटर जागेतून जलवाहिनी मार्ग प्रस्तावित आहे . उर्वरित काम पूर्ण झाले आहे . ६० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे . नगरसेवक नंदा लोणकर यांनी जलवाहिनीसाठी संरक्षण खात्याची ना हरकत परवानगी साठी सातत्याने तीन वर्षे प्रयत्न करून अद्याप ना हरकत परवानगी मिळालेली नाही . यासाठी नगरसेविका नंदा लोणकर ,नगरसेवक गफूर पठाण ,नारायण लोणकर ,माजी नगरसेवक रईस सुंडके ,हाजी फिरोज हे खा . वंदना चव्हाण यांच्यासमवेत संरक्षण मंत्र्यांना भेटले .
लोहगाव विमानतळाला लागून असलेल्या बांधकामांना पाडण्याच्या नोटीस पालिकेने बजावलेल्या आहेत . या प्रश्नासंबंधी संरक्षण खात्याच्या नियमांनुसार पालिकेने पुन्हा सर्वेक्षण करावे ,अन्यथा रहिवाशांवर अन्याय होईल ,अशी विनंती नगरसेवक सुनील टिंगरे यांनी केली . त्यांच्या समवेत हेमंत खेसे ,हर्षल टिंगरे ,सचिन अगरवाल उपस्थित होते .
‘या दोन्ही प्रश्नात आपण अहवाल मागवू आणि लवकरात लवकर निर्णय घेऊ ‘,असे आश्वासन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्याची माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली

