पुणे :
पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्र २. एन. डी. मेश्राम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यां विरोधात पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करून घेण्यास नकार दिला व सदरील दोषारोपपत्र फरासखाना पोलीस ठाणे यांच्याकडे परत पाठवण्याचे आदेश दिले.
दिनांक २७/१०/२०१६ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी ऐन दिवाळीच्या काळात झालेल्या अन्न धान्याच्या भाववाढीच्या विरोधात पुणे जिल्हाच्या पालक मंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली होती व त्यासंबंधी फरासखाना पोलीस स्टेशन यांनी १) अशोक राठी २) गणेश नलावडे ३) दीपक जगताप ४) हेमंत येवलकर ५) शेरअली शेख ६) राकेश कामठे ७) वनिता जगताप ८) मनाली भिलारे ९) श्वेता होनराव १०) संतोष ढोक ११) रवींद्र माळवदकर १२) रुपाली चाकणकर व इतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर वरील व्यक्तींवर भा.द वी कलम १८८ व महा.पो.अधि.३७(१)(३) सह १३५ अन्वये दोषारोपपत्र मे न्यायालया समोर दाखल करून घेणेस दि १५/०१/२०१८ रोजी विनंती केली होती .
त्यावर आरोपींच्या वकिल अॅड. रोनक अनिल व्हनकळस व अॅड. इम्रान मजीद पठाण यांनी तीव्र आक्षेप घेतला व त्यांनी ,फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ४६८ च्या तरतुदीनुसार सदर गुन्ह्याची शिक्षा सहा महिन्यापेक्षा जास्त नसल्यामुळे सदर गुन्ह्याची दखल मे. न्यायालयाला मुदतबाह्य झाल्याने म्हणजेच गुन्हा दाखल झाल्यापासून एक वर्षाच्या आत न घेतल्याने आता घेता येणार नाही असा युक्तिवाद करून कोर्टाच्या निदर्शनास आणले.
त्यावर मे कोर्टाने सरकारी वकील यांचे युक्तिवाद एकूण 18 जानेवारी रोजी आरोपींच्या वकिलांचा आक्षेप घेतलेला युक्तिवाद ग्राह्य धरीत दोषारोपपत्र मुदतीत न दाखल केल्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यास नकार दिला व सदरील दोषारोषपत्र फरासखाना पोलीस ठाणे यांच्याकडे परत पाठवण्याचे आदेश दिले.