पुणे :स्वच्छतागृहा अभावी पुण्यात कात्रज परिसरात एका महिलेचा मृत्यू झाला. या अत्यंत दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी आणि महिला स्वच्छतागृह प्रश्नाबाबत कार्यवाही होण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने आज पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त कार्यालय येथे शीतल तेली -उगले यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या अध्यक्ष मनाली भिलारे, युवती पदाधिकारी तेजवंती कपले, स्नेहल शिंगारे, शिवानी माळवदकर, आबोली घुले, अश्विनी परेरा, गितांजली सारगे, अक्षता राजगुरू, श्रध्दा ठाकूर उपस्थित होत्या.
महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे एका महिलेचा बळी गेला आहे ही वस्तुस्थिती पाहता पालिकेच्या संबंधित प्रशासन खाते आणि अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
‘पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस सातत्याने महिला स्वच्छतागृहांची दुरावस्था यासंदर्भात पालिकेकडे पाठपुरावा करीत आहोत. स्वछतागृहांचा अहवाल आम्ही यापूर्वी अनेकदा महानगरपालिकेला सचित्र सादर केला आहे. तरी त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही ही शोकांतिका आहे. एका बाजूला स्मार्ट सिटीच्या वल्गना करण्यात रमलेले प्रशासन मात्र मूलभूत व प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करीत आहे. महानगरपालिकेकडून न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे कात्रजच्या घटनेने पुन्हा सिद्ध झाले आहे’, असे पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या अध्यक्ष मनाली भिलारे म्हणाल्या.
या निवेदनात म्हणल्याप्रमाणे, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट १९४९ (chapter VI) नुसार महापालिका, अधिकाऱ्यांचे अधिकार आणि कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. तर कलम ६३ नुसार त्यांच्या अनिवार्य जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या अधिनियमानुसार स्वछतागृह बाबत महापालिकेने त्यांची कर्तव्ये पूर्ण करावीत. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात हे अपेक्षित आहे. परंतु पुणे महानगरपालिका आयुक्त व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे.