पुणे :
पुणे रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे मालधक्का बंद करण्याच्या निर्णयाबद्दल आणि रेल्वे स्टेशनमध्ये कूल कॅबला जागा न देण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला आक्षेप घेणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना लिहिले आहे.
पुणे मालधक्का अनेक वर्षांपासून पुणे आणि स्टेशनचे अविभाज्य अंग आहे. पुण्यातील रेल्वे स्टेशनवर जड सामान ठेवणे आणि सामान उतरविण्यासाठी स्टेशनचा वापर करणार्या हमालांशी कोणतीही चर्चा न करता, पूर्व सूचना न देता त्यांना बेरोजगार करण्यात आले आहे.
या विषयी वारंवार निवेदने देवूनदेखील काही उपयोग होत नसल्याने असंघटित क्षेत्र आणि हमालांसाठी कार्यरत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी यासंदर्भात 11 डिसेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने काही प्रतिसाद दिलेला नाही. हे दुर्देवाचे आहे. असे खासदार चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.
कूल कॅब रेल्वे स्टेशनवरील एक अविभाज्य भाग आहे. कूल कॅबसाठीची रेल्वे स्टेशनची जागा ओला आणि उबेर कॅबला देण्यात आली आहे. कूल कॅबचालक संघटित नसल्याने त्यांनी टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतलेला नव्हता म्हणून त्यांना पार्किंग लॉटपासून वंचित ठेवता येणार नाही. पुणेकर नागरिक विशेषतः महिलांना कूल कॅब नेहमीच सुरक्षित ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना स्टेशनवर पार्किंग मिळावे, अशी मागणीही खासदार वंदना चव्हाण यांनी या पत्रात केली आहे.