पुणे-गिरीश महाजन कमरेला बंदूक लावून एका कार्यक्रमात वावरत होते. महाजन यांना बंदुकीचा परवाना प्राणी मारायला दिला आहे का . बिबट्याला मारणे हे मंत्र्यांचे काम आहे का, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात केला. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल मोर्चा काढला. त्याचं नेतृत्व अजित पवार यांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार यांनी राज्यसरकारवार टीका करताना म्हटले, ” मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा घोटाळ्या प्रकरणी कुलुगुरुंना हटवण्यात आलं. तर, कर्जमाफीतील गोंधळाच्या प्रकरणात सचिव विजय गौतम यांना हटवण्यात आलं. मात्र, कुलगुरू आणि सचिवांना हटवून काय उपयोग? संबंधित खात्याच्या मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी” राज्य सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही. कारवाई करताना फक्त प्रशासनावर केली जाते.प्रशासनावर नियंत्रण असणाऱ्या मंत्र्यांची मुख्य जबाबदारी असते. त्यांच्यावर कधी कारवाई करणार, असा सवाल अजित पवार यांनी केला.
” गिरीश महाजन यांना काही समजतं की नाही हेच समजत नाही. गिरीश महाजन कमरेला बंदूक लावून एका कार्यक्रमात वावरत होते. महाजन यांना परवाना प्राणी मारायला दिला आहे का ? बिबट्याला मारणे हे मंत्र्यांचे काम आहे का?” असा सवालही त्यांनी यावेळी केला.