पुणे: महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीस विदयुत पंप जो़डून पिण्याचे पाणीझटपट मिळवू पाहणाऱ्या नागरिकांना झटका द्यायला गेलेल्या लष्कर पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने ३५ विजेच्या मोटारी जप्त तर केल्या ,मात्र आम्हाला पुरेसे व नियमित पाणी दया, नंतरच कारवाई करा, असा महिलांनी आक्रोश केला. संतप्त महिलांनी आक्रोश करीत लष्कर पाणी पुरवठा विभाग कार्यालयावर धडक मोर्चा नेला व अधिका-यांना घेराव घातला. अखेर अधिका-यांनी माघार घेत विदयुत पंप नागरिकांना परत केले.
यावेळी काय म्हणाले नागरिक
– आम्हला नियमित व पुरेशे पाणी दया, नंतरच कारवाई करा.
– विदयुत पंप विकत घेणे व महिन्याला अधिकचे वीज बील आम्ही का भरू ?
– उंच भागात नळाला पाणीच येत नाही.
– विदयुत पंपाने उपसा केला तरच थोडेफार पाणी मिळते.
– 48 टक्के केलेली पाणी कपात करून आमच्यावर अन्याय करू नका.
– पंपाद्वार पाणी उपसा करण्यास नागरिकांची इच्छा नाही, याला महापालिकाचा जबाबदार आहे.
– आम्ही नियमित कर भरतो, हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. अन्याय सहन करणार नाही.
लष्कर पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. 23) रात्री धडक मोहिम राबवीत जलवाहिनीला विदयुत पंप लावून पाणी उपसा करणा-या 35 मोटारी जप्त केल्या. त्यानंतर लष्कर पाणी पुरवठा कार्यालयावर महिलांनी थेट मोर्चा काढला. मोर्चा नेल्यानंतर महिलांनी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांच्याशी संपर्क साधला. कारवाईबाबत त्यांना माहिती दिली. ससाणे थेट लष्कर पाणी पुरवठा कार्यालयात पोहचले. त्यांनी अधिका-यांना धारेवर धरले. ते म्हणाले, हडपसर परिसराला 48 टक्के पाणी पुरवठा कमी होत आहे. उंच भागात नळाला आठ-आठ दिवस पाणी येत नाही. पाण्याची वेळ नियमित नाही. पाण्याला प्रेशर कमी आहे. त्यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी हैराण झाले आहेत. अनेक सोसायटयांना वर्षभर टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे सोसायटयांची अर्थव्यवस्था कोलम़डली आहे. नागरिक महापालिकेला प्रामाणिकपणे कर भरतात. मग त्यांना पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. आधी पाणी पुरवठा सुरळीत करा, नंतरच कारवाई करा. अन्यथा कारवाई करायला आलात तर तुमचे काही खर नाही असा दम त्यांनी अधिका-यांना भरला. तसेच कारवाई करायची असेल तर शहरातील अनअधिकृत नळजोड अगोदर तोडा. शहरात अनेक ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा होतो. हडपसरवासीयांवर अन्याय करू नका, असे कार्यकारी अभियंता संतोष पवार यांना सुनावले.