पुणे :
दिनांक ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदी ला आज बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. सरकारच्या या चुकीच्या निर्णयाने सर्वसामान्य जनतेची खूप गैरसोय झाली असून, देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे संयोजन शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी केले.
या मोर्चामध्ये जालिंदर कामठे, संजोग वाघिरे, जयदेव गायकवाड, रवींद्र माळवदकर, अंकुश काकडे, चेतन तुपे, विश्वास देवकाते, रमेश थोरात, दीपक मानकर, प्रशांत जगताप, चंचला कोद्रे, वैशाली बनकर, नंदा लोणकर, रुपाली चाकणकर, राकेश कामठे, मनाली भिलारे, पंडित कांबळे, अशोक राठी, राजलक्ष्मी भोसले, कमल ढोले-पाटील, बापू पठारे, काका चव्हाण, दत्तात्रय भरणे, विलास लांडे, श्रीकांत पाटील, योगेश बहल, शशिकांत तापकिर, भोलासिंग अरोरा, मिलिंद वालवडकर, स्वप्नील खडके, विवेक वळसे, अर्चना घारे, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, सर्व तालुक्याचे अध्यक्ष, पिंपरी-चिंचवडचे पदाधिकारी, आजी-माजी आमदार व महापौर, मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘किमया चहाच्या किटलीची, हौस फिटली ‘अच्छे दिन’ची’, ‘अच्छे दिन का हो गया प्रचार, कौन सहेगा अत्याचार !’, ‘सबका साथ, सबका विकास, उद्योगधंदे साफ, रोजगार भकास !’, ‘अन्न झाले महाग, मरण झाले स्वस्त, भाजपा सरकार झाले मदमस्त !’ अशा घोषणा मोर्चात देण्यात आल्या.
‘नोटबंदी निर्णयानंतरच्या अनियोजित अंमलबजावणीमुळे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली असून सामान्य नागरिकांना याचा अधिक त्रास झाला . आर्थिक आणीबाणीमुळे सामाजिक, आर्थिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले .
मोर्चास सकाळी १०. ३० वाजता महात्मा फुले मंडई येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून मोर्च्यास सुरुवात झाली. नेहरू चौक, बोहरी आळी, सोन्यामारुती चौक, दारूवालापूल, नरपतगिरी चौक अशा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाची सांगता झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष, खा. वंदना चव्हाण यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना केंद्र सरकार साठी तयार करण्यात आलेले निवेदन सादर केले. निवेदन सादर करताना आमदार जयदेव गायकवाड, राजलक्ष्मी भोसले, रमेश थोरात, रवींद्र माळवदकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘अर्थकारणाविषयीचे अज्ञान, भारतीय समाज विषयाचे अज्ञान आणि मनाला आला तो निर्णय घेण्याची प्रवृत्ती यातूनच नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला. काळा पैसा बाहेर येण्यासाठी जनतेची दिशाभूल केली. नागरिकांचा नोटा बदलताना रांगेत मृत्यू झाला. विकासदर दोन टक्क्यांनी घटला. रोजगार बुडाले. सर्व नोटा चलनात परत आल्यामुळे काळा पैसा येण्याची घोषणा हवेत विरल्या. दहशतवादी व नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. काळा पैसावाले मजेत फिरत आहेत. मग काय मिळविले हा निर्णय घेऊन? असा आमचा प्रश्न आहे.’, असे या निवेदनात नमूद केले आहे.

