पालक मंत्र्यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी केली निदर्शने, चुलीवर स्वयंपाक आणि सायकल रॅली
पुणे : भाजपा सरकारच्या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा गणपती मंदिर येथील कार्यालयासमोर चूल मांडून कार्यकर्त्यांनी निषेध केला.
या वेळी भाजपा शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘या महागाई चे करायचे काय सामान्य जनतेने खायचे काय ?’, ‘महागाई ने जनता पेटली, अच्छे दिनची हौस फिटली’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दरवाढ विरोधी घोषणा देत सायकल रॅली काढली.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली चाकणकर, अशोक राठी, राकेश कामठे, रवींद्र माळवदकर, भोलासिंग अरोरा, शशिकला कुंभार, उर्मिला गायकवाड, रत्नप्रभा जगताप, वैशाली बनकर, मीना पवार, अनिस सुंडके, बाळासाहेब बोडके, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रुपाली चाकणकर म्हणाल्या ‘पालक मंत्री आपले धोरण नीट राबवत नाहीत, ऐन सणासुदीच्या काळात गॅस , भाजी, कडधान्ये अशा प्रकारच्या दैनंदिन वापरातील वस्तू ची दरवाढ करून सरकारने जनतेची पिळवणूक केली आहे. वारंवार या बाबतचे निवेदन देऊनही काही फरक न पडल्याने आम्ही ज्वारीची भाकरी आणि मिरची चा आहेर पालक मंत्र्यांना देत आहोत कारण या भाव वाढीमुळे सामान्य जनतेला कदाचित हेच खावे लागणार आहे.’