पुणे- महापालिका हडपसरमधील रामटेकडी येथे नव्याने कचरा प्रकल्प सुरुवात करणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन येत्या 7 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक नगरसेवकांनी विरोध केला असून याठिकाणी कचऱ्याच्या गाड्या येऊ देणार नाही. तसेच तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला आहे.
शहरातील कचरा शहरातच जिरवण्याच्या दृष्टिकोनातून शहरात नव्याने प्रकल्प उभारण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीला योजनेला 2 वर्ष झाल्याच्यानिमित्त पुणे महापालिका विविध प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार आहे. यात हडपसर येथे रामटेकडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, याला हडपसरमधील प्रभाग क्र 22, 23, 24, 25, 26 आणि 27 मधील सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध आहे.
यापूर्वी हडपसरमध्ये हंजर बायोटेक, दिशा वेस्ट मॅनेजमेन्ट, अजिंक्य, रोकेम, जनावरे जाळण्याचा कारकस प्रकल्प, कॅन्टोन्मेंट कचरा प्रकल्प हे सर्व प्रकल्प हडपसर परिसरात असून गेली अनेक वर्षे हडपसरचे नागरिक या कचऱ्याचा त्रास सहन करीत आहेत. या कचरा प्रकल्पामुळे त्यांच्या आरोग्यास प्रचंड धोका आहे. रामटेकडी येथे यातील रोकेम व दिशा वेस्ट मॅनेजमेन्ट हे दोन प्रकल्प आहेत. सदर प्रकल्पांमुळे संपूर्ण हडपसर परिसरातील नागरिकांना डास, माशा, दुर्गंधी याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातच भर म्हणून आणखी 13 एकरावर नवीन प्रकल्प सुरू केल्यास हडपसरकरांच्या आरोग्यास आणखी प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो.
हडपसरकरांनी सर्व पुण्याचा कचरा आणि कचऱ्याचा त्रास सहन करण्याचा काही ठेका घेतलेला नाही. यापूर्वी कारकस प्रकल्प, गुरांचे गोठे, डुकरांसाठीचे पुनर्वसन हे हडपसर परिसरात करण्यात आलेले आहे. याचा अर्थ पुणे शहरातील संपूर्ण वेस्ट मटेरियल फक्त आणि फक्त हडपसरच्या माथी मारण्याचा जो घाट प्रशासनाने आणि भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांनी घातलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असे नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

