‘भारतीय जनता पक्षाचे शहरात गुंडाराज खपवुन घेतले जाणार नाही’: खा. वंदना चव्हाण
पुणे :
पुणे महानगरपालिकेत धुडगूस घालून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडी संदर्भातील नुकसान भरपाई आणि कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले.
‘भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत केलेल्या तोडफोड प्रकरणी नुकसान भरपाई आणि कारवाई साठी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरने आज हे आंदोलन केले आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे सामान्य करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पालिकेत तोडफोड झाल्याने पालिकेत घबराटीचे वातावरण पसरले होते. नागरिकांना प्रवेश करण्यापासून रोखल्याने त्यांची गैरसोय झाली. आजवर असा धुडगूस कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घातला नव्हता.
या तोडफोडीमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे साडे पाच लाख रूपयांचे नुकसान झाले असून, भारतीय जनता पक्षाकडून निव्वळ 51 हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. पक्षांचे पदाधिकारी पालिकेत हाणामारी करत असतील, तर शहरात गुंडाराज आल्याचे दिसते आणि हे गुंडाराज खपवून घेतले जाणार नाही, हे वर्तन अशोभनीय आहे.’, असे मत खा. वंदना चव्हाण यांनी आंदोलना दरम्यान व्यक्त केले.
आज महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहर अध्यक्ष खा.वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनामध्ये चेतन तुपे, रविंद्र माळवदकर , वैशाली बनकर , चंचला कोद्रे, लक्ष्मी दुधाने, दत्ता धनकवडे , महेंद्र पठारे, अशोक राठी , स्मिता कोंढरे, रूपाली चाकणकर, मनाली भिलारे , राकेश कामठे , विपुल म्हैसुरकर आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दिमाखदार परंपरा असलेल्या पुणे महानगरपालिकेत अभूतपूर्व धुडगूस घालून तोडफोड करणार्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष खा. वंदना चव्हाण यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती.