पुणे -भाजपने जाहीरनाम्यात पुण्याची स्मार्ट सिटीसाठी झालेली निवड आणि शहराच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या कामाची ही पावती आहे, महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेला जाहीरनामा हा कॉपीपेस्ट आहे. या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने केलेल्या कामाची दखल घेतली असल्याबद्दल भाजपचे आभार, असे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपने जाहीरनाम्यात पुण्याची स्मार्ट सिटीसाठी झालेली निवड आणि शहराच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या कामाची ही पावती आहे, असे वंदना चव्हाण म्हणाल्या. भाजपने आमच्या कामाची दखल घेतली असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, भाजप पारदर्शकतेचा टेंभा मिरवत आहे. पण भाजपच्या सहा मंत्र्यांनी केलेले घोटाळे ते सोयीस्करपणे विसरले आहेत. मुंबई महापालिकेतून काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांना नागपूर पालिकेत काम देण्यात आले आहे. नोटाबंदी केल्यानंतर किती काळा पसा आला याची माहिती का जाहीर केली जात नाही.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या संकेतस्थळावर सर्व उमेदवारांच्या तयार क्लिप अपलोड केल्या आहेत. समाजमाध्यमांच्याद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे मनाली भिलारे यांनी सांगितले.

