प्रभाग क्रमांक 58 मध्ये अवयवदान सभासद नोंदणी मोहिम
पुणे :
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पुणे शहर आणि झेड.टी.सी.सी., पुणे (झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अवयव दान अभियाना’ अंतर्गत खडकमाळ आळी (प्रभाग क्रमांक 58) मध्ये अवयव दान सभासद मोहीम, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा स्नेह मेळावा आणि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्ष खासदार अॅड.वंदना चव्हाण, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या विभागीय प्रत्यारोपण समन्वयक आरती गोखले, माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, कमलनानी ढोले-पाटील, रवींद्र माळवदकर, जयदेव गायकवाड, डॉ. संजीव जाधव, डॉ. सुरेश शिंदे, आप्पा रेणूसे, मनाली भिलारे, खड़क माळ आळीतील सर्व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा हा उपक्रम संपूर्ण पुणे शहरात राबविला जाणार आहे. तसेच या उपक्रमातंर्गत शहरातील आठ विधानसभा मतदार संघात अर्ज आणि अवयवदान जनजागृती विषयी माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. या अभियानातंर्गत खडकमाळ आळी येथील अवयवदान नोंदणी केलेल्या नागरिकांना प्रशस्तीपत्रक आणि ‘अवयवदाता कार्ड’ चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस नितिन उर्फ बबलू जाधव यांनी केले होते.
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना खा.वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘अवयवदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या प्रमुख उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे.’
‘गरजू रुग्ण आणि अवयवांची उपल्ब्धता यातील तफावत भरून काढण्याकरीता हा उपक्रम स्तुत्य ठरणार आहे,’ असे मत आरती गोखले यांनी यावेळी व्यक्त केले.