पुणे- राज्य सरकार एकीकडे महिला सुरक्षेसाठी विविध कामे नियोजनबद्धरीत्या करत असताना दुसरीकडे महावितरण मात्र वारंवार वीजपुरवठ्यात व्यत्यय आणीत ,प्रसंगी कित्येक तास अंधाराचे साम्राज्य पसरवून महिलांना जेरीस आणीत आहे. महावितरण च्या संबधित अधिकाऱ्यांनी वेळीच सुरळीत वीजपुरवठा देण्याबाबत योग्य ती पावले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलनाचे पडसाद उमटतील असा खणखणीत इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी नितीन कदम यांनी महावितरण ला दिला आहे .
त्या म्हणाल्या ,’मंगळवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 नंतर साधारण आठ ते दहा तास तावरे कॉलनी अरण्येश्वर, परिसरांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामध्ये एलआयसी कॉलनी, जीवन प्रकाश सोसायटी, पार्वती हॉल लेन, सुरभी कार्यालय, अरण्येश्वर नगर व नवरत्न हॉटेल च्या गल्लीतील सर्व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. माहिती घेत असता असे समजले हाय टेन्शन केबलच्या फॉल्ट मुळे सदरचा बंद विद्युत पुरवठा बंद झाला होता. अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना नाहक मनस्ताप सोसायला लागला. तसेच खंडित झालेला पुरवठा पूर्ववत तातडीने करणे आवश्यक असताना सदर कामाला आठ ते दहा तास अवधी लागला. पर्यायी लाईन्स वरून विद्युत पुरवठा करणे(backfeed) उपलब्ध नसला मुळे तोपर्यंत या भागातील नागरिकांन अंधाराशी सामना करण्यास लागला.तसेच मार्केटयार्डकडुन सदरच्या भागास विद्युत पुरवठा होत असल्यामुळे वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत आहेत यासाठी पर्यायी व्यवस्था सुद्धा तातडीने करणे आवश्यक आहे. जीवन प्रकाश सोसायटीच्या गार्डन पासून सांबर हॉटेल, पार्वती हॉल, अजिंक्य हॉल ते सांबर हॉटेल ही हाय टेन्शन (high tension) केबल भूमिगत करणे अत्यंत गरजेचे आहे. सदरचे काम पूर्ण झाल्यास या ठिकाणी असलेल्या नागरिकांना विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्यापासून निश्चित दिलासा मिळेल.

