मुंबई-शिवसेनेने आम्हाला कालच संपर्क साधला आहे. त्यामुळे आम्ही आज मुंबईत आलो. मात्र शिवसेनेसोबत जाण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आधी दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा होईल. किमान समान कार्यक्रम ठरेल, त्यानंतरच आम्ही शिवसेनेसोबत काही मुद्द्यांवर चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असं काँग्रेसने स्पष्ट केलं.
राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे आता आम्हाला घाई नाही. आम्हाला भरपूर सवड आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र मिळून निवडणूक लढवलं होतं. त्यावेळी आम्ही एकत्रित निवडणूक अजेंडा तयार केला होता. आता नवं सरकार बनवताना किमान समान कार्यक्रम तयार करण्यात येईल. त्यासाठी शिवसेनेचं काय धोरण आहे. किमान समान कार्यक्रम कसा असावा? याबाबत शिवसेनेशी चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ. विचारधारासमोर ठेवूनच आम्ही पुढे जाणार आहोत. आता कुठे आमच्यात चर्चा सुरू झाली आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं. यावेळी अहमद पटेल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारने कधीच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही. त्यांनी गोव्यापासून ते मणिपूरपर्यंत कायद्याचं उल्लंघन केलं आहे. राष्ट्रपती राजवट हा भाजपचा मनमानी कारभार आहे. त्यामुळेच आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निषेध करत आहोत, असं पटेल म्हणाले. राज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेचा दावा करण्याचं निमंत्रण दिलं. पण काँग्रेसला बोलावलं नाही, हे अत्यंत चुकीचं होतं, असंही ते म्हणाले.