पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री जयंत पाटील यांची निवड करण्यात आली. पुणे येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने ही निवड करण्यात आली. दरम्यान, प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक, खजिनदारपदी हेमंत टकले तर सरचिटणीसपदी शिवाजी गर्जे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदासाठी दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे आणि विधान परिषदेतील नेते धनंजय मुंडे यांच्या नावाचीही चर्चा होती. धनंजय मुंडे यांच्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडले. अखेर जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनीही अनुकूलता दर्शवल्याने पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.
जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव सुनील तटकरे यांनी मांडला. या प्रस्तावाला धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे यांनी अनुमोदन दिले. एकमुखाने अनुमोदन दिल्याने जयंत पाटील यांची निवड केली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, प्रफ्फुल पटेल, विजयसिंह मोहिते पाटील, डी.पी.त्रिपाठी, गणेश नाईक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.