पुणे : ‘आगामी विधानसभेची निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेऊन दाखवा; मग खरी ताकद कोणाच्या पाठीमागे हे महाराष्ट्र ठरवेल’ अशा थेट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. विधानसभा निवडणुकीत युतीच्या २२० जागा निवडून येतील, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मतपत्रिकांवर निवडणूक घेऊन पहावे सरकार येते की नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. ‘निवडणूक मतपत्रिकांवर घेण्याची मागणी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. शिवसेनेच्या मनातही तेच आहे, फक्त दबाव असल्याने ते बोलत नाहीत,’ असा टोला लगावून पाटील म्हणाले, ‘इलेक्ट्रॉनिक मतयंत्रांमध्ये (ईव्हीएम) फेरफार करता येतात. त्यामुळे जर्मनीनेही ईव्हीएमवर बंदी घातली आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष मतपत्रिकांवर निवडणुकीची मागणी करत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याबाबत खुलेपणाने निर्णय घ्यावा.’
ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या -म्हणजे खरी ताकद कळेल ..जयंत पाटील
Date: