‘शहरातील महिला स्वच्छतागृहांची संख्या केवळ 68: खा. वंदना चव्हाण
पुणे :
‘पुणे शहराचा विचार केला तर सध्या महिलांची लोकसंख्या 17 लाखांहून अधिक झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अत्यल्प असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून दिसून येते. उपलब्ध स्वच्छतागृहांमध्ये सोयी सुविधांचा अभाव दिसतो. त्यामुळे नवीन स्वच्छतागृहे बांधण्याआधी उपलब्ध स्वच्छतागृहांची देखभाल, डागडूजी करणे, तेथे आवश्यक सोयींची उपल्बधता करणे अधिक आवश्यक आहे. महिला, युवती यांच्या नागरी समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहेत. याप्रश्नाकडे दुर्लक्षच होत राहील्यास वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करू’, असे शहराध्यक्ष व खासदार अॅड.वंदना चव्हाण म्हणाल्या.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ही पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस, पक्ष कार्यालय, हिराबाग चौक येथे शनिवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष मनाली भिलारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, युवती पदाधिकारी तेजवंती कपले, स्नेहल शिनगारे,कृतिका चिवटे, मिताली जाधव उपस्थित होत्या.
यावेळी मनाली भिलारे यांनी शहर परिसरात केलेल्या सर्वक्षणांची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून दिली. त्यांनी आणि युवती काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी शहर परिसरातील महिला स्वच्छतागृहांची पाहणी केली होती. तसेच नितीन उर्फ बबलू जाधव यांनी पुरुष सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण केले. या स्वच्छतागृहांची अवस्था देखील दयनीय आहे.
परिषदेदरम्यान बोलताना खा.वंदना चव्हाण पुढे म्हणाल्या, ‘जोपर्यंत अस्तित्वात असलेली स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवली जात नाहीत किंवा त्यांची निगराणी राखण्यात यश मिळत नाही तोपर्यंत नवीन स्वच्छतागृहे बांधण्यास लोकांकडून विरोध होईल. स्वच्छतागृहामध्ये ‘चेक लिस्ट’ असली पाहीजे. जेणेकरून साफसफाईचे आराखडे समजतील. प्रशिक्षित महिला सफाई कामगारांची भरती आवश्यक आहे. स्वच्छतागृह दत्तक योजना, महिला सूरक्षा पॉलिसी, महिला बचत गटाद्वारे स्वच्छतागृहांची देखरेख याबाबी प्रामुख्याने अमलात याव्यात.’
मनाली भिलारे केलेल्या सर्वेक्षणाद्वारे आपले मत मांडताना म्हणाल्या, ‘स्वच्छतागृहांचे धोरण आणि महापालिका करीत असलेल्या उपाययोजना यांचा आढावा घेतल्यावर, त्यात त्रुटी असल्याचे जाणवते. तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणीही महापालिकेकडून होत नसल्याची दिसून आले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसने हा प्रश्न हाती घेतला आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन अॅक्ट 1949 (चॅप्टर 6) नुसार आणि कलम 63 नुसार त्यांच्या अनिवार्य जबाबदार्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या अधिनियामानुसार स्वच्छतागृहांबाबत महापालिकेने त्यांची कर्तव्ये पूर्ण करावीत असे नमूद केले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी अधिकार्यांच्या नियुक्त्या करून त्यांच्या जबाबदार्या निश्चित कराव्यात हे अपेक्षित असताना देखील पुणे महानगरपालिका आयुक्त व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. ’
स्वच्छतागृहांअभावी युवती, महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांत महिला स्वच्छतागृहांबाबत जागरूकता निर्माण करून ती सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातही अनेक वर्षापासून शहराध्यक्ष व खासदार अॅड.वंदना चव्हाण यासाठी आग्रही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस गेल्या चार वर्षांपासून ‘महिला स्वच्छतागृहे’ या विषयावर सक्रिय आहे.
महिला स्वच्छतागृहांबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर निर्णय देताना, न्यायालयाने स्वच्छतागृहांसाठी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांना दिला.
शहरातील 17 लाख महिलांसाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात 62 मुतार्या बांधल्या आहेत, असे प्रमाण शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 27 हजार 419 महिलांमागे एक मुतारी, असे प्रमाण शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र गेल 5 वर्षात फक्त महिलांसाठी 6 मुतार्या बांधण्यात आल्या आहेत. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल 2016 रोजी विधानपरिषदेत केलेल्या निवेदनातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
गर्दीच्या ठिकाणी 100 महिलांमागे एक मुतारी असावी व शहरांमध्ये मानांकनाप्रमाणे 35 ते 50 व्यक्तीमागे 1 शौचालय उपलब्ध असणे असे राष्ट्रीय निकष आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्यासंदर्भात देखील प्रशासनाची कर्तव्य कायद्याने निश्चित केली असून, मात्र या गोष्टींना हरताळ फासला जात असल्यामुळे याबाबत राष्ट्रवादी युवती काँग्रेस सातत्याने पाठपुरावा करणार आहे. उपलब्ध महिला स्वच्छतागृहांमध्ये प्रामुख्याने पाणी, विज, साफसफाई, प्रशिक्षीत महिला सफाई कामगार यांची तरतुद असावी.’ प्रशासनाकडून अॅक्शन प्लॅन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष मनाली भिलारे यांनी केला.