पुणे-महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न टकमक टोकावर उभा आहे. राज्यकर्त्यांची कातडी गेंडय़ाची झाली आहे. शहरातील मध्यमवर्गीय महागाईने त्रस्त झाला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी विधानसभेत जाळ्या लावण्यात सरकार मश्गूल आहे. राज्यात ९० मिनिटांनी एक आत्महत्या, ७५ मिनिटांनी एक बलात्कार आणि ६० मिनिटांनी एक विनयभंग होत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आली असून भयाचे आणि अस्वस्थततेचे वातावरण आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भाषणे झाली.
पाटील म्हणाले, बूथ कमिटय़ांवर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. हे नाही झाले तर आपल्याला आपले विचार योग्य ठिकाणी पोहोचवता येणार नाहीत. ही यंत्रणा चार महिन्यांत उभी करावी लागेल, तरच आपले संघटन भक्कम होईल. राष्ट्रवादीत कोणताच गट नाही. दीड वर्षांत पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढू आणि काम करू आणि अपेक्षित असणारा पक्ष घडवू. हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाने निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आणि सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. जयाला कधी अंत नसतो. त्यामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विजयपथावर येईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. कठीण कालखंडात पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सत्ता नसताना कोण आपला हे समजले. सर्वानी चांगली साथ केली, अशी भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

