मुंबई-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबीयांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर काही वेळापूर्वी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. मलिक यांच्या पुढील कोठडीबाबत न्यायालयात दोन तास युक्तिवाद सुरू होता. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग ईडीच्या वतीने हजर झाले, तर अमित देसाई आणि तारक सय्यद यांनी मलिक यांची बाजू मांडली.
कोर्टातील सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी 1993च्या बॉम्बस्फोटांशी संबंधित एक गोपनीय जबाब कोर्टासमोर ठेवला आहे. मलिक आजारी असल्याने आणि रुग्णालयात दाखल असल्याने त्यांचे जबाब नोंदवता येणार नाहीत, असे सांगून एएसजी यांनी न्यायालयाला त्यांच्या कोठडीत सहा दिवसांची वाढ करण्यास सांगितले. ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने मलिक यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.
नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिक यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि ईडीने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला रद्द करण्याची मागणी केली. मलिकांनी आपल्या याचिकेत आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे आणि त्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे.
मलिक यांच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबाभोवतीचा फास आवळला जात आहे. आज त्यांचा मुलगा फराज मलिक याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले. मात्र, मंगळवारी पत्र पाठवून फराजने ईडीकडे एक आठवड्याची मुदत मागितली होती.
मलिक यांना सोमवारी संध्याकाळी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
25 फेब्रुवारी रोजी पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नवाब मलिक यांना सोमवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांना पुन्हा मुंबईतील बॅलार्ड स्टेट येथील ईडी कार्यालयात आणण्यात आले. ते ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत होते, जी आता वाढवून 7 मार्चपर्यंत करण्यात आली आहे.
मलिक यांनी तपासात सहकार्य न केल्याचा आरोप
ईडीच्या कोठडीत चौकशीदरम्यान नवाब मलिक चौकशीत सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना दाखल करण्यात आल्याचे वृत्त आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत ईडीकडून एम्स दिल्लीचे खासगी डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचेही अपडेट करण्यात आले. दरम्यान, नवाब मलिक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मलिक यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. फराज आणि अमीर अशी मुलांची नावे आहेत, तर निलोफर आणि सना अशी मुलींची नावे आहेत.
नवाब मलिक यांच्यावर हे आहेत आरोप
मुंबईतील ईडीचे सहायक संचालक नीरज कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, नवाब मलिक हे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट, 2002 च्या तरतुदींनुसार शिक्षापात्र गुन्ह्यात दोषी आढळले आहेत. म्हणून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (15 ऑफ 2003) च्या कलम 19च्या उप-कलम (1) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, मी मोहम्मद नवाब मोहम्मद इस्लाम मलिकला अटक करतो. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी 14.45 वाजता अटक करण्यात आली.