मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मुंबई भाजपचे सरचिटणीस मोहित कंबोज यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात माझगाव न्यायलयाने मलिक यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावरील जामीन मंजूर केला आहे. यासोबतच, कोर्टाने नवाब मलिक यांना 5000 रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत.
भाजपचे मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात माझगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. कंबोज यांनी मलिकांच्या विरोधात 100 कोटींचा दावा केला आहे. या प्रकरणात कोर्टाने गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, सोमवारी सुनावणी झाली आणि मलिकांना जामीन मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 डिसेंबर रोजी होणार आहे.
मलिकांनी म्हटले होते ‘मुंबईतील क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात मास्टरमाइंड‘
मुंबईतील क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात एनससीबीने 3 ऑक्टोबर रोजी धाड टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काहींना अटक केली होती. तेव्हापासूनच नवाब मलिक यांनी एनसीबीच्या विरोधात एकानंतर एक आरोपांची मालिकाच सुरू केली. “आर्यन खानला अटक नाही तर त्याचे अपहरण करण्यात आले आणि खंडणी मागण्यात आली. या संपूर्ण कटकारस्थानाचे मुख्य सूत्रधार मोहित कंबोज आहेत.” असा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदांमधून केला होता. याच प्रकरणी मोहित कंबोज यांनी मलिकांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाच्या अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला.आर्यन खानच्या अटकेनंतर चर्चेत आलेले मोहित कंबोज मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. सोशल मीडियावर त्यांनी स्वतःला भाजप कार्यकर्ता म्हटले आहे. पण, गेल्या काही वर्षांमध्ये ते भाजपमध्ये विविध पदांवर होते. 2016 ते 2019 पर्यंत त्यांनी भाजपच्या मुंबई युवा शाखेचे अध्यक्ष पद भूषविले होते. ऑगस्ट 2019 पासून ते मुंबईत भाजप सरचिटणीस आहेत.

