मुंबई-राज्यातील अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिकांना अटक केली याचा अर्थ नक्कीच ईडीकडे त्यांच्या विरोधात सबळ पुरावे असतील. जामीन मिळवण्यासाठी मलिक उच्च न्यायालयात सुद्धा जाऊ शकतात अशी प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. यासोबतच, मलिक यांच्या विरोधात झालेली कारवाई राजकीय सूड बुद्धीने तर झालेली नाही ना याचा तपास न्यायालयाला करावा लागेल असेही ते पुढे म्हणाले.
जामीनासाठी हायकोर्टातही जाऊ शकतात मलिक
उज्ज्वल निकम यांनी एका माध्यमाशी संवाद साधताना मलिकांची पुढची दिशा काय असू शकते याची माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मलिक यांना ईडीकडून कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी हे पाहावे लागेल. यानंतर ईडी कस्टडी मिळत असेल तर ती न्यायलयीन कोठडीत बदलता येईल. किंवा न्यायालयीन कोठडी असल्यास जामीनासाठी अर्ज करता येईल. यासाठी ते हायकोर्टात सुद्धा जाऊ शकतात. पण, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, ईडीला मलिकांची कोठडी घेण्यासाठी कोर्टात तसे सबळ पुरावे आणि युक्तिवाद मांडावे लागणार आहेत. अटक केली याचा अर्थ त्यांच्याकडे काही सबळ पुरावे असतीलच असे म्हणता येईल. दरम्यान, या अटकेमागे किंवा एकूणच कारवाईच्या मागे काही राजकीय हेतू आहे का याचा तपास देखील न्यायालयाला करावा लागणार आहे. मलिकांची पुढील कारवाई पूर्णपणे न्यायालयाच्या निकालावर विसंबून असेल असेही उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.

