मुंब- राज्य सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने त्यांचे नाव घेतले होते. ईडीने त्यांना सकाळी 7.45 वाजता मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेले होते.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते, त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे. मलिकांना अटक केल्यानंतर ईडीच्या पथकाने त्यांना रुग्णालयात नेले आहे, जिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात आहे.
जबरदस्तीने मला ईडी कार्यालयात आणले – मलिक
कोर्टात सुनावणीदरम्यान, नवाब मलिक कोर्टाला सांगितले की, त्यांना समन्स बजावण्याच्या बहाण्याने पहाटे घरी आलेल्या ईडीच्या टीमने त्यांना कसे ताब्यात घेतले आणि नंतर समन्सच्या प्रतीवर सही करण्यास सांगितले. यानंतर, ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की, 3 फेब्रुवारी 2022 रोजी दाऊद इब्राहिम कासकरविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. विविध दहशतवादी कारवाया आणि मनी लाँड्रिंगमध्ये त्याचा सहभाग आहे. दहशत निर्माण करण्यासाठी निधी उभारून अनधिकृतपणे मालमत्ता मिळवण्यातही त्याचा सहभाग आहे. एएसजीने पुढे माहिती दिली की दाऊदची बहीण हसिना पारकर यांचे निधन झाले आहे.
ती येथील दाऊदच्या कारवायांवर नियंत्रण ठेवत होती. पैसा जमवून त्याने भरपूर संपत्ती कमावली होती. कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमध्ये त्यांनी मालमत्ता घेतली होती. एएसजी पुढे म्हणाले की, त्यांनी मालमत्ता कशी मिळवली हे मी (ईडी) सिद्ध करू. मुनिरा आणि मरियम या संपत्तीच्या खऱ्या मालक आहेत. एएसजीने पुढे सांगितले की ही मालमत्ता वडिलोपार्जित मालमत्ता आहे. तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेची ती एकमेव मालक होती.
शरद पवारांची उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा, गृहमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत नवाब मलिक यांच्या अटकेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे मानले जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नवाबच्या अटकेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
झुकेंगे नहीं लडेंगे और जितेंगे! – मलिक
तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. झुकेंगे नहीं लडेंगे और जितेंगे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली. नवाब मलिक यांचे जेजे रुग्णालयात मेडिकल होईल. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, अशी माहिती आहे.
ईडी कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त
मिळालेल्या माहितीनूसार, ईडीचे पथक मलिकांच्या निवासस्थानी पहाटे 5 ते 6 दरम्यान गेले होते. त्यानंतर 7 वाजेदरम्यान पथक मलिकांच्या घरातून बाहेर पडले आणि 7.45 वाजता ईडीचे पथक कार्यालयात हजर झाले. यादरम्यान ईडीने आपल्या सोबत सीआरपीएफची एक टीम देखील सोबत आणली होती. मलिकांनी ईडीने चौकशीसाठी नेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी
दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरची आज ईडी कोठडी संपणार आहे. त्यापूर्वी मलिकांना ईडीने चौकशीसाठी नेले आहे. मिळालेल्या माहितीनूसार, इकबाल कासकरने चौकशीदरम्यान, नवाब मलिकांचे नाव घेतल्याचे कळते. ईडी सध्या दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी करत आहे. याचप्रकरणी कासकरला सात दिवस ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, कासकर आणि मलिक या दोघात झालेल्या जमीन व्यवहाराचे काही पुरावे ईडीला मिळाले आहेत. याप्रकरणी ईडीने आणखी दोन बिल्डरांना देखील समन्स बजावले आहे.

