लोकसभा सभापती यांच्याकडे राणा यांची वकिलांमार्फत तक्रार – फडणवीस म्हणाले
मुंबई-भोंग्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, राज्य सरकारची हिटलरी प्रवृत्तीमुळे संवादाला कुठेही जागा उरलेली नाही. त्यामुळे आम्हीदेखील राज्य सरकारसोबत संघर्ष करण्याची तयारी केली आहे. याच कारणामुळे आज बैठकीला न जाण्याची भूमिका आम्ही घेतली, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोलत होते .मुंबईत तसेच राज्यात मागील 2, 3 दिवसांत ज्या घटना घडल्या. त्या मुख्यमंत्र्यांच्याच इशाऱ्यावर करण्यात आल्या. मग आजच्या सर्वपक्षीय बैठकीला मुख्यमंत्री का उपस्थित राहिले नाही. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत गृहमंत्री काय चर्चा करणार होते आणि काय निर्णय घेणार होते, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नवनीत राणांना तुरुंगात अत्यंत हिन वागणूकअमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना तुरुंगात अत्यंत हिन वागणूक दिली जात आहे. सरकारच्या इशाऱ्यानूसारच त्यांना अशी वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. नवनीत राणा यांना तुरुंगात टॉयलेटसाठीही वेळेवर जाऊ दिले जात नाही. त्यांना पाणी व इतर सुविधाही वेळेवर पुरवल्या जात नाहीत. असे पत्र मला राणांच्या वकिलांमार्फत लोकसभा सभापतींना पाठविण्यात आले आहे.असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, तरुंग प्रशासनाकडून जाणूनबुजून त्यांना अशी वागणूक दिली जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
एका महिलेची एवढी भीती का?राज्यातील एका अपक्ष महिला खासदाराकडून मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा म्हणण्याची विनंती केली जात असेल तर यात एवढे घाबरण्यासारखे काय आहे. या महिलेला रोखण्यासाठी तिच्या घरावर 200 ते 300 गुंडांना पाठवले जाते. केवळ हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह केला म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. त्यांना अटक केली जाते. अटकेनंतरही त्यांचा छळ केला जातो. राज्यसरकारची ही गुंडशाहीची प्रवृत्ती असून त्याविरोधात आम्ही संघर्ष करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, सरकारला एका महिलेची एवढी भीती का वाटते, असा सवालही त्यांनी केला.
केरळ, पश्चिम बंगालमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, तरी आम्ही घाबरलो नाही!केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. तरीदेखील आम्ही घाबरलेलो नाही. हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे सरकारच्या गुंडशाहीला घाबरण्याचे अजिबातच कारण नाही. आम्ही पुर्ण ताकदीनिशी या गुंडशाहीविरोधात लढणार, असे फडणवीस म्हणाले.
पाकिस्तानात हनुमान चालिसा म्हणायची का?राज्यात हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह असेल तर आमच्यावरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा. राज्यात हनुमान चालिसा म्हणायची नाही तर ती काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, पोलिस संरक्षणात भाजप नेत्यांवर हल्ले केले जात आहे. त्यांना जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षाला संपवायचेच असा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.हिंमत असेल तर आमच्या पोलखोल सभांवर हल्ला करून दाखवा. आम्ही घाबरणारे नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
भाजप सत्तेत येणार, शरद पवारांना टोलामी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, अशी घोषणा करणाऱ्यांना राज्यात पुन्हा सत्ता मिळाली नाही. त्यामुळे हे नेते अस्वस्थ झाले आहेत. मात्र राष्ट्रपती राजवट लागू करण्यापर्यंत राज्यातील स्थिती जाणार नाही, असे वक्तव्य आज शरद पवार यांनी केले होते. त्यावर शरद पवार यांनी अस्वस्थतेवर बोलू नये, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच, राज्यात भाजपची पुन्हा येणार, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

