नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये लॉकडाउन आणि कोरोनावर चर्चा झाली. यापूर्वी 20 मार्च आणि 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनी संवाद साधला होता. कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी पंतप्रधानांनी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाउन जारी केला. तो लॉकडाउन 14 एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. यावेळी आपण मदतीसाठी आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे 24 तास उपलब्ध आहोत असे मोदी म्हणाले आहेत.
ठाकरेंनी मांडली महाराष्ट्राची कैफियत, लॉकडाउन वाढवण्याची मागणी
या चर्चेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री आप-आपल्या राज्यांची परिस्थिती मांडत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लॉकडाउन किमान 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात यावा अशी भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह दिल्ली आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लॉकडाउनचा कालावधी वाढवावा अशी मागणी केली आहे. अनेक राज्यांनी केंद्र सरकाकडून काय मदत हवी आहे याचा तपशील सुद्धा मांडला आहे.
अनेक राज्यांकडून लॉकडाउन वाढवण्याची मागणी
आतापर्यंत देशातील 9 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन वाढवण्याची मागणी केली आहे. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी डगमगलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणता येईल. परंतु, गेलेले जीव परत येणार नाहीत असाही तर्क दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून लॉकडाउनवर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यानंतर 14 एप्रिल रोजी मोदी पुन्हा चौथ्यांदा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून लॉकडाउन हटवणे किंवा वाढवण्यावर अधिकृत घोषणा करू शकतात असे सांगितले जात आहे.

