मुंबई-नितेश राणे हे सध्या पोलिसांना सापडत नाहीतेय. त्यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आज त्यांच्या कणकवली येथील घरावर पोलिसांनी नोटीस चिटकवली आहे. दरम्यान संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांनी नारायण राणेंना टोला देखील लगावला आहे. पुत्र असेल कोणीही असेल नारायण राणेंनी त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे राऊत म्हणाले.नारायण राणेंविषयी बोलताना राऊत म्हणाले की, ‘आपण एक जबाबदार मंत्री आहात. पोलिसांना सहकार्य करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांच्या जागी कोणीही असेल राज्याचे मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, कोणताही मंत्री असेल. त्यांनी पोलिसांपासून माहिती लपवणे चुकीचे आहे. गुन्हेगाराला पाठीशी घालणे देखील चुकीचे आहे. अन्यथा गुन्हेगाराला पाठी घालण्यासंदर्भात तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो.
हे सरळ सरळ कायद्याचे उल्लंघन
नितेश राणे यांच्यावर सिंधुदुर्गात शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कधीही अटक केली जाऊ शकते. दरम्यान नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याचे कळतेय. महाराष्ट्रातील पोलिस त्यांचा शोध घेत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘हा विषय गृहमंत्रालयाच्या संदर्भातील आहे, विधी आणि न्याय खात्या अंतर्गतचा विषय आहे. काल केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद आम्ही ऐकत होतो. तेव्हा पोलिसांना हवा असलेला संशयित आरोपी तो कोणीही असेल. पोलिस त्यांना शोधत आहेत. एका अटेंम्पट मर्डरच्या प्रयत्नात पोलिस शोधत आहेत. आणि केंद्रीय मंत्री म्हणतात की, ते कुठे आहे हे मला माहितीये पण मी सांगणार नाही. हे सरळ सरळ कायद्याचे उल्लंघन आहे.’
महाराष्ट्र पोलिस पाताळातूनही गुन्हेगाराला शोधून आणतील
राऊत म्हणाले, ‘पुत्र असेल कोणीही असेल नारायण राणेंनी त्याची माहिती पोलिसांना द्यावी. तसेच एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा दुसऱ्या कुणी कुणाला लपवून ठेवले असेल तर तो कसा सापडणार. पण महाराष्ट्राचे पोलिस शोधतील. तुम्ही पाताळात जरी लपला असाल तर महाराष्ट्राचे पोलिस शोधून आणतील.’