मुंबई-संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. देशात महाराष्ट्र सरकारमुळे कोरोना पसरला असे विधान मोदी यांनी केले होते. त्यानंतर आता राज्य सरकारमधील नेते मोदी सरकारवर टीकास्त्र करताना पाहायला मिळत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील मोदींवर हल्लाबोल केला आहे. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकार मजूर, गरीब आणि परप्रांतियांच्या पाठिशी उभे राहिले. मात्र केंद्र सरकारने कोणताही विचार न करता देशात लॉकडाऊनची घोषणा केली. ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमामुळे देशात कोरोनाचा पसरला. असे म्हणत मलिकांनी केंद्र सरकारवर टीका केली.
सोमवारी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदींनी कोरोनावर भाष्य करत काँग्रेस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला ते म्हणाले की, ‘देशात लॉकडाऊन सुरू असताना सर्व तज्ज्ञ सांगत होते की, जिथे आहात तिथेच राहा, मात्र तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर मजुरांना मोफत तिकीट दिले, आणि लोकांना सांगितले की, तुम्ही यूपी आणि बिहारचे आहात, तिथे जाऊन कोरोना पसरवा. असे करुन काँग्रेसने मोठे पाप केले आहे.’ असा थेट आरोप पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राज्य सरकारवर केला होता. त्यानंतर आता मलिकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मलिक म्हणाले की, कोरोना काळामध्ये महाराष्ट्र सरकार मजूर आणि गरिबांच्या पाठिशी उभे राहिले. मात्र, तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लागू केला, अशी टीका मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. नमस्ते ट्रम्पच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोनाचा प्रादूर्भाव आणि प्रसार वाढला, ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. असे म्हणत नवाब मलिक यांनी मोदींवर टीका केली.
पुढे मलिक म्हणाले की, जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोरोना देशात पसरणार नाही, असे सांगितले होते. ‘नमस्ते ट्रम्प’च्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले. ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात कोरोना पसरला, असा आरोप मलिकांनी मोदींवर लावला आहे.
मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले. कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना, त्यांची सर्व व्यवस्था केली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर चालत निघाले होते. शेवटी आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बस सुरू केल्या, परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळ्या वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोक भोगत आहेत. असे म्हणत मलिकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

