आपल्या कटकारस्थानांनी नायकाला बेजार करणारा खलनायक आपण नेहमीच चित्रपटांमधून बघतो. हिंदी चित्रपटाला खलनायकांची एक मोठी समृद्ध परंपरा लाभली आहे. परंतु मराठी चित्रपटांत तुलनेने कमी खलनायक पडद्यावर साकारले गेलेत. आपल्या प्रभावी अदाकारीतून नायकाला जबर आव्हान देणारा खलनायक प्रेक्षकांनाही पहायला आवडतो. आगामी ‘नगरसेवक’ चित्रपटात मराठीतल्या सशक्त अभिनेत्यांची फौज आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. ‘जश पिक्चर्स’ प्रस्तुत शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित ‘नगरसेवक एक नायक’ या मराठी चित्रपटात सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे ही मंडळी आपल्या खलप्रवृत्तीतून नायकाला बेजार करताना दिसतील. येत्या ३१ मार्चला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
‘प्रत्येक नेता हा अभिनेता असतो’ असं म्हणणाऱ्या दत्ता शिवलकर या खलनायकाची भूमिका गणेश यादव यांनी साकारली असून सयाजी शिंदे हे भाऊ शेट्टी या स्थानिक पक्षप्रमुखाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सुनील तावडे यांनी या चित्रपटात खास बेरिंग धरत आमदार काळे उभा केला आहे, तर संजय खापरे यांनी निशिकांत कोळी या बेरकी कार्यकर्त्याची भूमिका रंगवली आहे.
नायक खलनायक ही जुगलबंदी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते. दिपक कदम दिग्दर्शित नगरसेवक मधील खलनायकांच्या या वेगवेगळ्या शेड्स प्रेक्षकांना निश्चितच भावतील. या चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर त्रियोगी मंत्री, प्रियांका नागरे, अभिजीत कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम,वर्षा दादंळे, मयुरी देशमुख या कलाकारांच्या भूमिका आहेत.चित्रपटाची कथा बिपीन धायगुडे व अभिजीत कुलकर्णी यांनी लिहिली असून संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिलेत. त्रिलोकी चौधरी यांनी छायांकन केले असून संकलन सुबोध नारकर याचं आहे.