पुणे-२००२ च्या गोध्रा दंगलीतील पीडिता बिल्कीस बानो यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने SSPMS कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुक निदर्शने करण्यात आली.
बिलकिस बानोला न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महिला काँग्रेस ,अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी काळे वस्त्र परिधान करत Bilkis Wants Justice”,”जातीयवादी भाजपा,महिला विरोधी भाजपा”,”बिल्कीस हम शरमिंदा है,जालीम अभी तक जिंदा है”,”स्मृती इराणी जवाब दो,बिल्कीस बानो को न्याय दो” असे फलक हातात घेत मुक निदर्शने करण्यात आली.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप यांनी यावेळी सांगितले कि,’ २००२ मध्ये जेव्हा गोध्रा दंगल पेटली त्यावेळी बिल्कीस बानो नावाची अवघ्या २१ वर्षांची तरुणी गावातील हिंदू-मुस्लिम वादाच्या परिस्थितीचा अंदाज आल्याने आपल्या गावापासून काही अंतरावर असणाऱ्या माहेरी जाण्याच्या उद्देशाने आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन घराबाहेर पडली. तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील व गावातील काही मुस्लिम नागरिक देखील बाहेर पडले. याचवेळी त्या गावातील २०० ते २५० जणांच्या प्रक्षोभक जमावाने बिलकिस व तिच्या कुटुंबीयांवर हल्ला केला यातील १० ते १२ जणांनी बिल्कीस वर सामूहिक अत्याचार केले. इतक्यावरच ते थांबले नाही तर बिलकसच्या सोबत असणाऱ्या तिच्या कुटुंबियांची देखील यात हत्या करण्यात आली. या अत्याचाराचा कळस म्हणजे बिलकिसच्या लहान मुलीची अक्षरशः दगडावर ठेचून हत्या करण्यात आली. बेशुद्ध पडलेल्या बिलकिसला मृत समजून त्या जमावाने तिथून काढता पाय घेतला परंतु शुद्धीवर आलेल्या बिलकिसने त्यानंतर कसेबसे गावाच्या बाहेरील एका आदिवासी कुटुंबीयांकडे आसरा मागितला तेथील आदिवासी महिलेने बिलकिसची मदत केली. पुढे अनेक सेवाभावी संस्थांच्या मार्फत बिलकीसची ही लढाई सुरू झाली. प्रकरण न्यायालयात गेले, न्यायालयाने अकरा आरोपींना आमरण जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बिल्कीस बानोला घर आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. बिलकिसने आपली लढाई लढून न्याय मिळवला परंतु दुर्दैव असे की देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशात स्त्री सक्षमीकरणाचे भाषण देत असताना गुजरातमधील भाजप सरकारने बिलकीस बानोच्या आरोपींची शिक्षा माफ केली. इतकेच नाही तर या आरोपींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात आरोपींचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी या आरोपींचे सत्कार केले. भाजप सरकार आपल्या या सर्व कृतीतून काय संदेश देऊ इच्छित आहे……? असा सवाल मी या निमित्ताने भाजपला करू इच्छितो.देशातील मुस्लिम बांधवांप्रती भारतीय जनता पार्टीच्या मनात इतका द्वेष का आहे…? सुमारे वीस वर्षे चाललेल्या लढाईला अत्यंत निंदनीय असे वळण गुजरातमध्ये लागले आहे.एक समाज म्हणून पाहताना केवळ बिलकिस बानो कुठल्या धर्माची आहे, ह्या गोष्टींकडे न पाहता बिलकिस एक महिला आहे. सर्व धर्म समभाव जपणाऱ्या भारत देशात बिलकिस सारख्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला न्याय भाजप सारखा राजकीय पक्ष मोडून काढत असेल, तर हा न्यायालयाचा देखील अवमान असल्याचे मी या ठिकाणी नमूद करतो”, असेही प्रशांत जगताप यांनी यावेळी म्हटले आहे. .
या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, मृणालीनी वाणी, किशोर कांबळे, सुषमा सातपुते , समीर शेख , शमीम पठान , तनवीर शेख, चांद मणूरे , हमिदा शेख, परवीन तांबे ,जरीना आपा,हलीमा आपा , जिशान कुरेशी, बादशाह नायकवडी व ईतर पदाधिकारी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.