पुणे- विलगीकरण कक्षासह ,कोरोना विषयक सर्व उपचार आणि सुविधा पोहोचविणारी केंद्रे महापालिकेने पूर्ववत सुरु करण्यास विलंब केला असून हि सारी केंद्रे तातडीने सुरु करून नागरिकांच्या हालापेष्टा थांबवाव्यात अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.
त्या म्हणाल्या ,’कोरोना या संसर्गजन्य रोगाची पुन्हा लाट आली असून पुणे शहरात कोरोना बाधीत रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून दैनंदिन ३००० हून जास्त रुग्ण आढळून येत आहेत. काही महिन्यांपूर्वी पुणे शहरात ३००० हून जास्त रुग्ण आढळून येत होते तेव्हा पुणे महापालिकेची असलेली तयारी (उदा. सीसीसी सेंटर्स व इतर सुविधा) हि सद्यस्थितीत नसल्याने नागरिकांची पुन्हा हेळसांड होण्यास सुरुवात झाली आहे.कोरोनाचे दैनंदिन ३००० हून वाढते रुग्ण पाहता पुणे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पुणे शहरात मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून काही ठिकाणी एका कुटुंबात कमीत कमी ६ व जास्तीत जास्त १० नागरिक राहतात, बहुतांशी कुटुंबात वयोवृद्ध नागरिक असतात. घरातील एक जरी व्यक्ती कोरोना बाधित झाली तरी वयोवृध्द नागरिकांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. सध्या महानगरपालिकेच्या वतीने कोरोना बाधीत रुग्णाला होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. परंतु एका घरात साधारण ५-६ जण राहत असल्या कारणाने कोरोना बाधीत रुग्णाला होम आयसोलेशन करणे सर्वांनाच शक्य होत नाही. यासाठी सीसीसी सेंटर पूर्वीप्रमाणे महानगरपालिकेने पुणे शहरात क्षेत्रीय कार्यालय निहाय सुरु करावे. वरील बाबींचा सकारात्मक विचार प्रशासनाने करावा, ही नम्र विनंती. तसेच खाजगी दवाखान्यामध्ये अनेक नागरिकांना बेड्स उपलब्ध होत नाही यासाठी व्यवस्था करावी. याविषयी तातडीने सर्व पक्षनेत्यांची तातडीने बैठक बोलविण्यात यावी.

