पुणे- आज31 मार्च अखेर पुणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये 1845.91 कोटी इतका मिळकत कर जमा झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात यंदाच्या आर्थिक वर्षातील ही उच्चांकी रक्कम असल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सह आयुक्त विलास कानडे यांनी दिली.
1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत पुणे महापालिकेच्या हद्दीतील 8 लाख 68 हजार 671 मिळकत धारकांनी मिळकत करापोटी 1845.91 कोटी रुपये जमा केले आहे. या आर्थिक वर्षात काही कालावधीसाठी लॉकडाऊन असल्यामुळे मिळकत धारकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंट द्वारे मिळकत कराचा भरणा केला आहे.
अभय योजनेतून 108 कोटींचा मिळकत कर
पुणे महापालिकेच्या वतीने निवासी मिळकत धारकांसाठी अभय योजना लागू केली होती. ही योजना 7 जानेवारी 2022 ते 26 जानेवारी 2022 आणि 8 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत दोन टप्प्यात राबवण्यात आली होती. अभय योजनेत पात्र असलेल्या मिळकत धारकांपैकी 48 हजार 304 निवासी मिळकतधारकांनी 108.83 कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे.वापरात बदल झालेल्या मिळकतींची देखील मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली.
या आर्थिक वर्षामध्ये 98 हजार 611 मिळकतींची बदलाप्रमाणे वाढीव आकारणी करण्यात आली.त्यामुळे महापालिकेला या वर्षात वाढीव आकारणीतून 201.04 कोटी रुपयांचा अतिरिक्त कर मिळाला आहे.
नव्या मिळकतीमधून 219 कोटींचा कर
मिळकत कर जास्तीत जास्त वसूल करण्याबरोबरच आकारणी न झालेल्या मिळकतींची आकारणी करण्यासाठी पुणे महापालिकेने नियोजन केले होते.त्यामुळे आता पर्यंतच्या एक वर्षातील नव्याने आकारणी होणाऱ्या मिळकतींचा उच्चांकी आकडा आहे.
यामध्ये 71 हजार 220 एवढ्या नव्याने मिळककतींची नोंद करण्यात आली आहे.या मिळकतीमधून महापालिकेच्या तिजोरीत 219.23 कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे.

