मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघणार नसल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरपर्यंतच्या खरीप पिकांसाठी आठ हजारांची तर फळबागांसाठी अठरा हजार रुपयांची प्रति हेक्टरी मदत घोषित करण्यात आली आहे.यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की,खरीप पिकांसाठी एकरी ३२०० रुपये आणि फळबागांसाठी एकरी ७२०० रुपये मदत ही तर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच आहे. ३२०० रुपयात तर बियाणे सुद्धा येत नाही आणि फळबागेत तर ७२०० रुपये हा दोन दिवसांचा फवारणीचा खर्च असतो.महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली असती तर त्यांना काही अंशी दिलासा मिळाला असता असे ते म्हणाले. याशिवाय नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.मात्र शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे त्याचबरोबर कर्जवसुली ला स्थगिती देणे हे राज्यातील आत्महत्या कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक होते.शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी त्यांना रब्बीच्या पिकांसाठी बीबियाणे आणि खते घेण्याकरिता ठरावीक रक्कम तातडीने बिनव्याजी देणे आवश्यक होते. कारण एक वर्षांपूर्वी दुष्काळ घोषित झालेल्या शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही तर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आणि ते रब्बीसाठी भांडवल कधी उभे करणार हाही प्रश्नच असल्याचे भुजबळ म्हणाले.