मुंबई-मराठी आणि हिंदी सिनेक्षेत्रात मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना फसवून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे. वर्सोवा परिसरात हा वेश्याव्यवसाय चालत होता. नवीनकुमार प्रेमलाल आर्या (३२) असे डायरेक्टरचे नाव आहे. त्याचे साथीदार अजय शर्मा, विजय आणि अश्विनकुमार यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
याप्रकरणी समाजसेवा शाखेने एका अठरा वर्षीय मॉडेलची आणि २५ वर्षीय मेकअप आर्टिस्टची सुटका केली आहे. या दोन्ही तरुणी कलकत्ता येथील रहिवासी आहेत. तर मॉडेलिंग करणारी तरुणी एक वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बिग बजेट हिंदी चित्रपटात या मॉडेलने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नवीनकुमार हा वर्सोवा परिसरात सेक्स रॅकेट चालवितो, अशी माहिती समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक नवीनकुमार याच्या मागावर होते. बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी आलेल्या नवोदित अभिनेत्रींना हेरून नवीनकुमार त्यांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडतो, याची खातरजमा होताच पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी नवीनकुमारकडे मॉडेलची मागणी केली. त्यानुसार या ग्राहकाला दाखविण्यासाठी दोन मुलींना नवीनकुमार याने वर्सोवा येथील कॅफे कॉफी डे येथे आणले. यातील एका मुलीच्या बदल्यात त्याने ६० हजार रुपयांची मागणी या बनावट ग्राहकाकडे केली. बनावट ग्राहकाने नवीनकुमारला पैसे देताच पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली.
ही कारवाई रेवले यांच्यासह पोलीस शिपाई शिशुपाल रामोळे, पाटसुपे यांच्या पथकाने केली. मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असलेली मुलगी दिल्ली येथील दलाल अश्विनकुमार याच्या माध्यमातून मुंबईत आली होती. पोलिसांनी पीडित मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवीनकुमार आणि त्याच्या साथीदारांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.