मुंबई –सकाळच्या काही फेऱ्यात पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूने असणारा मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांचा नूर पूर्णपणे पालटला आहे. या निकालांनंतर मुंबईत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी भाजपने मिळवलेले यश हे अचंबित करणारे आहे. मुंबईतील शिवसेनेची आजपर्यंतची मक्तेदारी पाहता हे निकाल शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. ९३ जागांवर आघाडी घेतल्यानंतर शिवसेनेचा विजयरथ रुतून बसला. याच काळात निकालाचे पारडे भाजपच्या बाजूने झुकण्यास सुरुवात झाली. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार २२६ वॉर्डचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये शिवसेनेला ८४, भाजप ८१, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी ९, मनसे ७ आणि इतर उमेदवारांना १४ जागांवर विजय मिळाला आहे. पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ ही मॅजिक फिगर आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये अवघ्या तीन जागांचा फरक असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न होणार आहेत .
मागील निवडणुकीत भाजपला ३१ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आजच्या निकालांनंतर भाजपच्या संख्याबळात लक्षणीय वाढ झाली असून त्यांच्या नगरसेवकांची संख्या ८१ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे शिवसेनेचा स्वबळावर लढण्याच निर्णय भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे.