मुंबई : मनसेच्या सैनिकांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मनसे आणि काॅग्रेस मध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) भागातील आझाद मैदानाजवळ असलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवार) तोडफोड केली. कार्यालयातील काचा, फर्निचर, खुर्च्या, टेबलाची नासधूस केली. तसेच तेथील काही कर्मचार्यांनाही मारहाण केली.
आज घडलेल्या प्रकारावरून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप ,प्रत्यारोप करीत असतानाच काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मनसेची बाजू घेत काॅग्रेसला घरचा आहेर दिला आहे.मुंबई काँग्रेस महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार विसरल्याचे दिसत असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. मुंबई काॅग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर आ. नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे काँग्रेसने घेतलेल्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘मनसेने नक्कीच चुकीचे केलेले आहे. पण महात्मा गांधींच्या मार्गाचा अवलंब करणा-या काँग्रेसने याला उत्तर देताना अनीतीचा उपयोग केला आहे ? असा सवाल उपस्थित करत, मनसेविरोधात निषेध करताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांगड्या दाखवणे कितपत योग्य आहे ? हा महिलांचा अपमान नाही का , हीच का नैतिकता आणि विचारप्रणाली ? असे आ. नितेश राणेंनी ट्विट केले आहे.
दरम्यान, हल्लानंतर मनसेने याची चार तासांनी जबाबदारी स्विकारली. ‘होय, हा हल्ला आम्ही केला आहे. मनसेने काँग्रेसवर केलेला हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ आहे. ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’ असे ट्वीट करत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले.दरम्यान, याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह 7 ते 8 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

