मुंबई, दि. 28 : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी विनाअनुदानित प्राथमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य कपिल पाटील यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रश्नांबाबत शासन कोणती कार्यवाही करत आहे अशी लक्षवेधी सूचना मांडली.
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, मुंबई महापालिका क्षेत्रातील विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देणे,सातवा वेतन आयोग लागू करणे तसेच सर्व विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतील शाळांप्रमाणे २७ मोफत वस्तू देणे या निर्णयांबाबत महापालिकेसोबत बैठक घेऊन याबाबतीत निर्णय घेण्यात येतील. तसेच रात्रशाळा योजनाही प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्व शाळांना २८ ऑगस्ट २०१५ अन्वये संच मान्यता देण्यात आलेली आहे. संच मान्यतेचे निकष सुधारणा करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून सुधारित निकषांबाबतचा प्रस्तावदेखील मागविण्यात आला आहे. तसेच रात्र शाळेतील इयत्ती पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकेही देण्यात येत आहेत. शासनाकडून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी विनाअनुदानित प्राथमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.