मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

मुंबई, दि. 10 :- मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱया या प्रकल्पाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे. ठरलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल, याचा मला आत्मविश्वास असून प्रकल्पाच्या पहिल्या बोगद्याचे खणन जलदगतीने पूर्ण होणे, ही त्याची पोचपावतीच आहे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात, पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. पैकी मरिन ड्राइव्हकडे जाणाऱया वाहतुकीसाठी वापरात येणाऱया पहिल्या बोगद्याचे खणन आज (दिनांक १० जानेवारी २०२२) पूर्ण झाले. त्याप्रसंगी आयोजित ‘ऑनलाईन’ समारंभात मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे बोलत होते.

राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती मीनल पटेल हे देखील दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे यावेळी सहभागी झाले होते. तर मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे आदी मान्यवर प्रत्यक्ष स्थळी म्हणजे स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) येथे उपस्थित होते. तसेच, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. अजय राठोर, संचालक (भूसंपादन) श्री. अनिल वानखडे, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता) श्री. विजय निघोट यांच्यासह कंत्राटदार एल ऍण्ड टी यांच्या वतीने प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री. संदीप सिंग, बोगदा बांधकाम व्यवस्थापक श्री. संतोष सिंग, सल्लागार कंपनी मेसर्स यूशीन कन्सल्टंटच्या वतीने बोगदा बांधकाम व्यवस्थापक श्री. नॅमकाक चो हेही उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे संबोधित करताना म्हणाले की, मावळा नावाचे बोगदा खणन करणारे संयंत्र त्याच्या नावाला साजेसे काम करीत असून त्याच शिस्तीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील या प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. नैसर्गिक वादळांसह कोविड संसर्गाचे संकट व त्यामुळे उद्भवलेली टाळेबंदी सारखी परिस्थिती यांना खंबीरपणे सामोरे जावून अविरतपणे प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. समुद्राखालून दोन टोकं जोडण्याचे काम करण्यात मावळा संयंत्र यशस्वी झाले आहे. किनारा रस्ता प्रकल्प हे एकप्रकारे मुंबईचे स्वप्नं आहे. फक्त रस्ता बांधून न थांबता त्याच्या भोवती रमणीय व प्रेक्षणीय जागा विकसित केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या बांधकामात अनेक आव्हाने आहेत. मात्र महानगरपालिकेने ही आव्हाने स्वीकारुन मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरु ठेवली आहे. प्रकल्प निर्मितीसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य व पाठबळ मिळेल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, किनारा रस्त्याच्या पहिल्या बोगद्याचे खणन आज पूर्ण झाले असून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हे काम आत्यंतिक कठिण स्वरुपाचे असून ते यशस्वीरित्या वर्षभराच्या आत पार पाडणे, ही विक्रमी स्वरुपाची कामगिरी आहे. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते किनारा रस्त्याच्या पहिल्या बोगद्याच्या कामास शुभारंभ करण्यात आला होता. आता दुसऱया बोगद्याचे काम एप्रिल २०२२ मध्ये सुरु होईल. केवळ बोगदाच नव्हे तर संपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, याचा विश्वास आहे. मुंबईकरांचे राहणीमान सुखकर करण्याच्या दृष्टीने अर्थात इज ऑफ लिविंगसाठी विविध कामे मुंबई महानगरात सुरु आहेत. गोरेगाव-मुलूंड जोडरस्ता, पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल), मुंबई मेट्रो या सर्व प्रकल्पांसह मुंबई कोस्टल रोडमध्ये देखील महानगराचा विकास पुढे नेण्याची मोठी क्षमता आहे, असेही श्री. आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महानगरपालिकेने जे जे ठरवले, ते सर्व प्रकल्प पूर्ण करुन दाखवण्याची आमची परंपरा आहे आणि किनारा रस्ता त्याला अपवाद नाही. फक्त देशात नव्हे तर जगात देखील हा प्रकल्प नावाजला जाईल, अशा रितीने पूर्ण करुन लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल करु. टाळेबंदीच्या काळातही एकही दिवस या प्रकल्पाचे काम थांबले नाही आणि इतिहासात नोंद होण्याजोगी कामगिरी करुन हा प्रकल्प वेगाने पुढे सरकतो आहे, असे महापौरांनी सांगितले. पक्षप्रमुख पदी असताना श्री. उद्धवजी ठाकरे यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती आणि आता मुख्यमंत्री रुपाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या पाठबळाने हा प्रकल्प साकारतो आहे. त्यासाठी, संपूर्ण मुंबईकर जनतेच्या वतीने महापौर या नात्याने, मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री महोदयांना धन्यवाद देत असल्याचे महापौरांनी अखेरीस नमूद केले.

महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी पहिल्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता आणि त्यास वर्ष होण्यास एक दिवस शिल्लक असताना म्हणजे ३६४ दिवसांमध्ये या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ही विक्रमी कामगिरी असून संपूर्ण प्रकल्पाचे कामही वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही डॉ. चहल यांनी दिला.

तत्पूर्वी, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते पूजन व घंटानाद करण्यात आले. त्यानंतर ‘मावळा’ या बोगदा खणन संयंत्र (टीबीएम) ने बोगद्यातून बाहेर येत ‘ब्रेक थ्रू’ पूर्ण केला. दरम्यान, कोविड संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता, हा कार्यक्रम पूर्णपणे दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती स्मिता गवाणकर यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...