मुंबई
दरवर्षी मुंबईत छटपूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आगामी छटपूजा उत्सवाच्या तयारीबाबत भाजपा मुंबई अध्यक्ष, आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली छट उत्सव महासंघाचे अध्यक्ष मोहन मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी बैठक संपन्न झाली. दादर वसंत स्मृती येथील मुंबई भाजपा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, उत्तर भारतीयांचा छटपूजा हा पवित्र धार्मिक उत्सव आहे. हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा याकरिता भारतीय जनता पक्षाच्यावतीने सर्वतोपरी योगदान दिले जाईल. याच अनुषंगाने मुंबईतील छट उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. बैठकीत छट उत्सवासाठी आवश्यक सोयी सुविधांच्या उपलब्धतेबाबत चर्चा केली जाणार आहे असेही ते म्हणाले. यावेळी आर. यु. सिंह, अमरजीत मिश्रा, भाजपा बिहार प्रकोष्ठ अध्यक्ष डॉ. मनोज झा, महामंत्री सुशांत अंबष्ठ, देवेंद्र शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

