पुणे- महापौर मुक्ता टिळक यांचा बालपणापासून महापौरपदापर्यंतचा प्रवासाचे अंतरंग डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी प्रशालेतील विद्यार्थिनींनी घेतलेल्या मुलाखतीतून उलगडले. मुख्याध्यापिकासुलभा शिंदे, शाला समितीच्या सदस्या प्रा. स्वाती जोगळेकर, महापौरांच्या मातोश्री वर्षा लिमये यांची प्रमुख उपस्थिती होती. या मुलाखतीतील महत्वाचा भाग….
तुमच्या शिस्तबध्द जीवनाबद्दल सांगाल?
माझी आई शिक्षिका. त्यामुळे वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्याकडे बारीक लक्षं. अशी आई असल्यानंतर शिस्त लागणारचं. संध्याकाळच्या संस्कारांचे विशेष महत्व आहे. संस्कृत श्लोक शिकले. शिस्तीचा परिणाम प्रत्येक माणसावर होतो. खोटं बोलायचं नाही. चुकीचे आश्वासन द्यायचं नाही हे लहानपणापासून बिंबले. शिस्तीचे संस्कार जसे घरातून तसे शाळेतूनही. लग्नानंतर टिळकांच्या घरात आल्यावर संस्कारांमुळेच जबाबदारी पेलता आली.
तुमच्या शिक्षणाबद्दल सांगाल?
माझं शालेय शिक्षण कर्वे शिशुविहार, बालशिक्षण आणि विमलाबाई गरवारे शाळेत झालं. बारावीपर्यंत आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शिकल्यानंतर मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ङ्गर्ग्युसनमध्ये प्रवेश घेतला. मानसशास्त्रात बी. ए. केलं. मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये अभ्यास केला. एक वर्षाचा बागकामाचे प्रशिक्षण घेतले. जर्मन भाषा शिकले.
जर्मन भाषेचा अभ्यास?
होय, जर्मन भाषेत करिअर करायचं होतं. गणित व शास्त्रात विशेष गती नव्हती. संस्कृत व मराठी या भाषा आवडायच्या. जर्मन भाषा संस्कृत व मराठीच्या जवळ जाणारी. त्यांच्या व्याकरणात ही साम्य आहे. काही दिवस जर्मन भाषा शिकविण्याच्या शिकवण्याही घेतल्या.
आपले आदर्श कोण आहेत?
जे. आर. डी. टाटा. त्यांच्या व्यक्मितत्वातून डेलिकेशन दिसलं. इंदिरा गांधींचा प्रभाव होता. अटलजी नाव घेतल्यावर मनावर जे तरंग उमटतात ते शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाहीत.
आवडते छंद कोणते?
वाचनाची आवड आहे. व्यक्तिचित्र. रामायण, महाभारत ग‘ंथ वाचून काढले. वाचनाचा व्यक्तिमत्वावर परिणाम झाला. बागकामाची विशेष आवड आहे. त्यासाठी एक वर्षाचा अभ्यासक‘म पूर्ण केला. घराच्या गच्चीवरची तीन हजार किलो कचरा जिरवलायं. तुम्हीही कुंडीत बाग ङ्गुलवू शकता. घरातला कचरा घरात जिरवता येईल. गच्चीवरची शेती करायची आहे. उस, गहू, तांदूळ लावायचा आहे. निसर्गामुळे व्यक्तिमत्वात संवेदनशीलता येते. मातीशी जवळीक होते.
जीवनातील अविस्मरणीस प्रसंग?
मी महापौर पदावर विराजमान झाले. अहमदाबादमध्ये नदी सुधारणा, बीआरटी, कचरा प्रकल्प आदी अभ्यास दौर्याच्या वेळी गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्रीनरेंद्र मोदी यांची भेट झाली. अहमदाबादच्या टिळक गार्डनमध्ये टिळक पुण्यतिथीचा मोठा कार्यक्रमकरतो, असे मोदीजींनी आवर्जुन सांगितले. हा प्रसंग मनावर बिंबला गेला आहे.
महिला म्हणून महापौर पदाकडे कसे पाहाता?
महिलांकडून जास्त अपेक्षा असतात. आई म्हणून एक भावना असते. त्या भावनेतून किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी, शारीरिक, मानसिक आरोग्याची काळजी, ऍनिमियाचे प्रमाण कमी करणे, मुलींची सुरक्षितता, महिलांसाठी आरोग्यदायी स्वच्छ स्वच्छतागृहे आदीसाठी विशेष प्रयत्न कणार आहे. महिला सुरक्षिततेबाबत महिला लोकप्रतिनिधींवर अधिक जबाबदारी आहे. निर्जन भागात सीसीटीव्ही लावणार आहोत.
पीएमपी प्रवासात कोणत्या समस्या आढळल्या?
कार्यालयीन वेळेत महिलांसाठी स्वतंत्र बस व्यवस्था असावी. वर्दळीच्या व लांब पल्ल्याच्या स्वतंत्र बस व्यवस्था असाव्यात, बसथांबे सुस्थितीत असावेत, वाहतुकीची कोंडी सोडवावी अशा प्रवाशांच्या मागण्या आहेत. त्या रास्तही आहेत.
स्मार्ट सिटी योजनेसंदर्भात काय सांगाल?
ही मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. केवळ औंध बाणेर बालेवाडी नाही तर संपूर्ण शहरात ती प्रभावीपणे राबविणार आहे. पादचारी, दुचाकीस्वार, चारचाकी वाहतुकीला शिस्त लावणार. बससेवा व पाणीपुरवठ्यावर लक्ष देणार आहे. तुम्ही पुढील काळातील जबाबदार नागरिक आहात. नियम पाळणार आहात. त्यासाठी शिक्षणाचा उपयोग होणार आहे. टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण याच कल्पनेतून सुरू केले होते.
गणेशेात्सवात कोणते बदल व्हावेत असे वाटते?
गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा. बेटी बचाव, बेटी पठाओ, स्वच्छता, विज्ञान विषयावर देखावे व्हावेत. टिळकांनी शंभर वर्षांपूर्वी कोकण रेल्वेचा आराखडा तयार केला होता. असे प्रकल्प जनतेसमोर आणावेत. गणेशोत्सवात मनोरंजन असावे पण उथळ नको.
पुण्याचा महापौर कसा असावा?
महापौर हे शोभेचे पद नाही. जबाबदारीचे पद आहे. शहराचे प्रश्न मोठे आहेत. हे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधांवर भर देणार आहे.
एवढं यश मिळवल्यावरही पाय जमिनीवर कसे राहतात?
कुमारी माता, उसतोडणी महिला कामगार, तमाशा कलावंत आणि आत्महत्या केलेल्या पालकांच्या मुलींशी बोलल्यानंतर आपली पुढची पिढी शिकली पाहिजे असा त्यांचा आग्रह दिसून येतो. समाजातील या घटकांची अवस्था विदारक आहे. अशा लोकांना भेटले व जाणीवा जागृत होतात आणि पाय जमिनीवर राहतात. आपल्याकडील संत व ऐतिहासिक परंपरांचा उपयोग होतो. मुलींनो. तुम्हीही आदर्श नागरिक व्हावा, नियम पाळा. विनाकारण हॉर्न वाजवू नका. उपजत ज्ञानाचा योग्य व योग्य ठिकाणी वापर करा.
लहानपणी मुक्ता खूपच शांत पण चुणचुणीत होती. दंगा करीत नव्हती. कधीही त्रास दिला नाही. नियमितपणे शाळेत जायची. ती महापौर झाल्यानंतर अत्यानंद झाला. धन्यता वाटली. तिच्या हातून पुण्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा महापौरांच्या मातोश्री वर्षा लिमये यांनी व्यक्त केली.

